

नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतील. तसेच या दौऱ्यात तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा फक्त कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आला असून दुखातीतून सावरलेल्या आकाश दीपचे संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय व कसोटी मालिकेसाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
२२ ऑक्टोबरपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला प्रारंभ होईल. सर्वप्रथम उभय संघांत ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल. यासाठी भारताचा संघ आधीच जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर भारत-न्यूझीलंडमध्ये ५ एकदिवसीय व २ कसोटी सामनेदेखील होतील. ४ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. मात्र यातील पहिल्या तीन सामन्यांत गिल भारताचे नेतृत्व करेल, तर त्यानंतर गिलसह कसोटी संघातील खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. त्यामुळे चौथ्या व पाचव्या एकदिवसीय सामन्यात उपकर्णधार श्रेयस भारताचे कर्णधारपद भूषवेल. १९ नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होईल.
दरम्यान, पाठीच्या दुखापतीतून सावरत आकाश दीप संघात परतला असून, त्याने २०२५च्या इंग्लंड दौऱ्यात प्रभावी कामगिरी केली होती. मँचेस्टरमधील पदार्पणानंतर अंशुल कंबोजला संघातून वगळण्यात आले होते, परंतु आता तोसुद्धा कसोटी संघात परतला आहे. या दोन्ही वेगवान गोलंदाजांना न्यूझीलंड-अ संघाविरुद्धच्या तीन बहुदिवसीय सामन्यांसाठी भारत-अ संघातही स्थान देण्यात आले आहे. अलीकडील काळात चांगली कामगिरी न करणाऱ्या गुरनूर ब्रारला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. डाव्या पोटाच्या दुखापतीतून सावरत असलेला ऋषभ पंत तंदुरुस्तीच्या अटीवर कसोटी संघात सामील आहे.
वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणारा बुमरा न्यूझीलंड दौऱ्यात फक्त कसोटी मालिकेत खेळणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या दृष्टीने संघ व्यवस्थापन बुमराच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करत आहे. श्रीलंका दौऱ्याला मुकलेल्या बुमराने नुकत्याच जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघातून पुनरागमन केले होते. एकदिवसीय संघापासून सध्या त्याला दूर ठेवण्यात आले आहे.
एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर गिल, राहुल, कंबोज, कृष्णा हे खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीला लागतील. त्यामुळे उर्वरित दोन लढतींसाठी तिलक वर्मा, युवा कुमार कुशाग्र, आकिब नबी यांना संधी देण्यात आली आहे. तसेच श्रेयस कर्णधार झाल्यावर इशान किशन एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असेल. नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांना मात्र पाचही एकदिवसीय लढतींसह कसोटी मालिकेसाठीही संघात कायम राखण्यात आले आहे. अनुभवी रवींद्र जडेजा या दौऱ्यात फक्त कसोटी मालिकेचा भाग असेल.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे संघ
* पहिले तीन एकदिवसीय सामने : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुर्नूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा (तंदुरुस्ती चाचणीनंतर पुढील निर्णय).
* चौथा-पाचवा एकदिवसीय सामना : श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुर्नूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
* कसोटी मालिकेसाठी संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (तंदुरुस्ती चाचणीनंतर पुढील निर्णय), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.