
नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, तारांकित जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, युवा किरण जॉर्ज या भारतीय खेळाडूंनी गुरुवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. लक्ष्य सेन, एच, एस. प्रणॉय यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी एरिनामधील खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ही ७५० सुपर गुणांचा दर्जा असलेली स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत २९ वर्षीय सिंधूने जपानच्या मानामी सिझूला २१-१५, २१-१३ अशी सहज धूळ चारली. सिंधूसमोर आता पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इंडोनेशियाच्या जॉर्जिया तुंजुंगचे आव्हान असेल. बऱ्याच कालावधीनंतर कोर्टवर परतणाऱ्या सिंधूला या स्पर्धेसाठी मानांकन लाभलेले नाही. त्यामुळे चौथ्या मानांकित तुंजुंगविरुद्ध ती कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे पुरुष एकेरीत २४ वर्षीय किरणने अनपेक्षित आगेकूच करताना फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनिएरला २२-२०, २१-१३ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. किरणची आता चीनच्या वेंग हाँगशी गाठ पडेल. बुधवारी रात्री लक्ष्य व प्रणॉय यांचा पराभव झाल्याने आता पुरुष एकेरीत किरणवर भारताच्या आशा टिकून आहेत. पहिल्या गेममध्ये १४-२० असा पिछाडीवर असतानाही किरणने सलग आठ गुण मिळवून धक्कादायक विजय नोंदवला.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग यांच्या जोडीने केन मितुसियाशी आणि हिरोई ओकामुरा या जपानच्या जोडीला २०-२२, २२-१४, २१-१६ असे पिछाडीवरून ३ गेममध्ये नमवले. भारतीय जोडीने ही लढत १ तासाच्या संघर्षानंतर जिंकली. त्यांच्यासमोर दक्षिण कोरिया किंवा चायनीज तैपई यांच्यापैकी एका देशाच्या विजेत्या जोडीचे आव्हान असेल.
महिला आणि मिश्र दुहेरीत निराशा
महिला तसेच मिश्र दुहेरीत भारतीय जोड्यांनी निराशा केली. महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांना जपानच्या जोडीने नमवले. रितूपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा यांचाही पराभव झाला. मिश्र दुहेरीत सूर्या-प्रथमेश जोडीला यँग-हू या जोडीने हरवले. तसेच तनिषा-ध्रुव कपिला यांचाही पराभव झाला. त्यामुळे आता फक्त पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान शाबूत आहे.