इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा :सात्त्विक-चिरागला पुन्हा विजेतेपदाची हुलकावणी

२०२२मध्ये सात्त्विक-चिराग यांनी इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा :सात्त्विक-चिरागला पुन्हा विजेतेपदाची हुलकावणी
Published on

नवी दिल्ली : भारताची पुरुष दुहेरीतील तारांकित जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना सलग दुसऱ्या स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला गेम जिंकूनही खेलरत्न पुरस्कार विजेत्या सात्त्विक-चिरागला दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत कँग मिन ह्यूक आणि सियो जे या जोडीने भारताच्या दुसऱ्या मानांकित जोडीला १५-२१, २१-११, २१-१८ असे संघर्षानंतर तीन गेममध्ये हरवले. १ तास आणि ५ मिनिटांच्या झुंजीनंतर जागतिक विजेत्यांनी बाजी मारली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिरागला गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन स्पर्धेतसुद्धा अंतिम फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. मलेशिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात्त्विक-चिरागने या कोरियन जोडीवर मात केली होती. मात्र यावेळी कोरियन जोडीने त्या पराभवाची परतफेड केली.

२०२२मध्ये सात्त्विक-चिराग यांनी इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती. तसेच २०२३मध्ये त्यांनी एकंदर ४ स्पर्धा जिंकल्या. यंदा मात्र त्यांना दोन्ही आठवड्यांत विजेतेपदाने हुलकावणी दिली. सात्त्विक-चिरागव्यतिरिक्त, फक्त भारताच्या एच. एस. प्रणॉयने पुरुष एकेरीत किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अन्य सर्व भारतीय दुसऱ्या अथवा तिसऱ्या फेरीतच गारद झाले.

logo
marathi.freepressjournal.in