भारत-पाकिस्तान लढत ठरल्याप्रमाणेच; आशिया चषकाबाबत क्रीडा मंत्रालयाचे स्पष्टीकरण; द्विराष्ट्रीय मालिकांवर मात्र बंदी कायम
नवी दिल्ली : आगामी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा ही बहुराष्ट्रीय स्पर्धा असून यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत ठरल्याप्रमाणे होईल, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र या देशांतील द्विराष्ट्रीय मालिका यापुढेही बंद राहतील. भारत, पाकिस्तान अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी या देशांत मालिका होणार नाही, असेही क्रीडा मंत्रालयाने सांगितले.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ व पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई, ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. १४ सप्टेंबरला भारतीय संघ दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. मात्र ही लढत होईल की नाही, याविषयी संभ्रम होता.
गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडले असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अनेक नागरिकांचा बळी गेला. त्या निषेधार्थ भारताने लिजंड्स वर्ल्ड चॅम्पियनशीप लीगमध्ये (निवृत्त खेळाडूंची) पाकिस्तान संघाविरुद्ध दोन्ही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर बीसीसीआयवरही भारताच्या मुख्य संघाचे पाकिस्तानशी सामने आयोजित न करण्याबाबत चाहत्यांकडून दबाव टाकण्यात येत होता. मात्र आशिया चषक तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान लढती होत राहतील. फक्त या लढती भारत किंवा पाकिस्तानात होणार नाही, असेही क्रीडा मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. तसेच फक्त क्रिकेट नव्हे, तर अन्य क्रीडा प्रकारांसाठीही हे धोरण लागू असेल, असे समजते.
“क्रीडा मंत्रालयाने लागू केलेल्या नव्या धोरणानुसार भारताचा संघ पाकिस्तानमध्ये द्विराष्ट्रीय मालिकेसाठी जाणार नाही. तसेच त्यांचा संघही येथे येणार नाही. अन्य कोणत्याही देशांत या दोन संघांत मालिका होणार नाही. मात्र आशिया चषक ही बहुद्देशीय स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी खेळेल. आयसीसी स्पर्धा, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेतही हाच नियम लागू असेल,” असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जात नाही. आयसीसीने दोन्ही देशांत २०२७ पर्यंत त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा करार केला आहे. त्यामुळे बीसीसीआय आशिया चषकाचे यजमानपद भूषवत असली, तरी ही स्पर्धा करारानुसार यूएईत खेळवण्यात येत आहे. तसेच भारत-पाकिस्तान यांच्यात २०१२-१३नंतर एकही मालिका झालेली नाही. फक्त आयसीसी अथवा आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्येच ते आमनेसामने येतात.
दरम्यान, आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.
काय आहे भारत-पाकिस्तानचा करार?
-मार्च महिन्यात पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले. मात्र भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे तो सामनाही दुबईतच झाला. या स्पर्धेच्या पूर्वी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांची आयसीसीशी बैठक झाली. त्यानुसार दोन्ही संघांमध्ये करार करण्यात आला.
-आता २०२७पर्यंत भारताचे पुरुष अथवा महिला संघ पाकिस्तानमध्ये एखादी आयसीसी स्पर्धा असली, तरी तेथे जाणार नाहीत. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा संघही भारतातील आयसीसी स्पर्धेसाठी येथे येणार नाही. त्यामुळे यंदा ऑक्टोबरमध्ये महिलांचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होत असला, तरी पाकिस्तानचा संघ त्यांचे सामने कोलंबोत खेळणार आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ अन्य देशात त्यांचे सामने खेळेल.
तीन वेळा आमनेसामने?
यंदाच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरुद्ध उभे ठाकू शकतात. १४ सप्टेंबरला साखळी लढत झाल्यावर भारत-पाकिस्तान या दोघांनीही अ-गटातून आगेकूच केली, तर २१ सप्टेंबरला सुपर-४ लढतीत ते पुन्हा आमनेसामने येतील. तसेच या दोघांनीही अंतिम फेरी गाठली, तर २८ सप्टेंबरला चाहत्यांना पुन्हा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. एकूणच हे सर्व दोन्ही संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
भारताचे आशिया चषकातील सामने
-१० सप्टेंबर वि. यूएई (दुबई)
-१४ सप्टेंबर वि. पाकिस्तान (दुबई)
-१९ सप्टेंबर वि. ओमान (अबुधाबी)