दुबई : महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यंदा चाहत्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या दिवसांमध्ये भारत-पाकिस्तान लढतीचा महासंग्राम अनुभवायला मिळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ रविवार, ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे महिलांचा विश्वचषक रंगणआर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी टी-२० विश्वचषकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. आधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र तेथील हिंसाचार आणि खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव आता आयसीसीचे मुख्य कार्यकारी जेफ अलार्डीस यांनी ही स्पर्धा आता दुबई आणि शारजा येथे खेळवण्यात येईल असे जाहीर केले होते.
यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ होणार असून भारतीय संघ ४ ऑक्टोबर रोजी दुबईत न्यूझीलंडविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. त्यानंतर अनुक्रमे पाकिस्तान (६ ऑक्टोबर), श्रीलंका (९ ऑक्टोबर) व ऑस्ट्रेलिया (१३ ऑक्टोबर) यांच्याशी भारतीय संघ भिडणार आहे. १७ व १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य सामने होतील, तर २० तारखेला दुबईत अंतिम लढत होईल. उपांत्य व अंतिम फेरीसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. स्पर्धेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेशी दोन सराव सामने खेळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देशातून पळ काढला. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंनी बांगलादेशमध्ये जाण्यास नकार दर्शवला होता. तसेच काहींनी आयसीसीला स्पर्धा अन्य ठिकाणी खेळवण्याची विनंतीही केली. त्यामुळे अवघ्या महिनाभरावर स्पर्धा असताना आयसीसीला यूएईला यजमानपदाचा मान द्यावा लागला. बांगलादेशमध्ये प्रथमच महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र आयसीसीने त्यांना भविष्यात अन्य एखाद्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी देऊ, असे आश्वासन दिले आहे.
२००९पासून सुरू झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम झाले आहेत. यांपैकी ६ वेळा ऑस्ट्रेलियाने, तर प्रत्येकी एकदा वेस्ट इंडिज व इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने २०२०मध्ये हरमनप्रीतच्याच नेतृत्वाखाली विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. यंदाही २०२३च्या टी-२० विश्वचषकाप्रमाणेच १० संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
विश्वचषकाची गटवारी
अ-गट : भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका
ब-गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश
भारताचे सामने
वि. न्यूझीलंड : ४ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा.
वि. पाकिस्तान : ६ ऑक्टोबर, दुपारी ३.३० वा.
वि. श्रीलंका : ९ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा.
वि. ऑस्ट्रेलिया : १३ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा.