
दुबई : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेटचे द्वंद्व चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) जाहीर करण्यात आले आहे. पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे संमिश्र प्रारूपात (हायब्रीड मॉडेल) आयोजन करण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुबईत खेळवण्यात येईल.
पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र शासनाने भारतीय संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले. यानंतर आयसीसीने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) संमिश्र प्रारूपाचा प्रस्ताव स्वीकारण्यास भाग पाडले. गेल्या ६ महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाचा तिढा कायम होता. मात्र आता स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडे असले, तरी भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तसेच भारत उपांत्य व अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर या लढतीही दुबईत होतील. मात्र भारताने आगेकूच न केल्यास सर्व लढती पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येतील.
यापूर्वी २०१७मध्ये अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवले होते. त्यानंतर ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी थेट पात्र धरले. त्यापैकी अ-गटात भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान हे संघ असतील. १९ फेब्रुवारीला कराची येथे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड लढतीने चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ होईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळतील. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तान व २ मार्च रोजी न्यूझीलंडशी भारताची गाठ पडेल. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असले तरी पाकिस्तानमध्ये कराची, लाहोर, रावळपिंडी या तीन ठिकाणी लढतींचे आयोजन करण्यात येईल. ४ व ५ मार्च रोजी उपांत्य फेरी होणार असून यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच ९ मार्चला होणाऱ्या अंतिम लढतीसाठीही राखीव दिवस असेल. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
“चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे. या स्पर्धेतील १५ सामन्यांत चाहत्यांना ८ संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळेल. दुबई व पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाईल,” असे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा म्हणाले. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही आयसीसीचे आभार मानताना पाकिस्तान स्पर्धेचे आयोजन करण्यास आतुर असल्याचे सांगितले. आयसीसीने व पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार भारतात होणाऱ्या २०२६चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या महिलांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येणार आहेत.
२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेसुद्धा संमिश्र प्रारूपात आयोजन करण्यात यावे, असे बीसीसीआयने सुचवले होते. २०२३च्या आशिया चषकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. तर पाकिस्तानचा संघ काही लढती त्यांच्या देशात खेळला. त्यानंतर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. मात्र त्यांना मुंबईत खेळण्याची संधी मिळाली नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा उभय संघांमधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप कसे?
१९९८पासून आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे नववे पर्व असेल. ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात म्हणजेच प्रत्येकी ५०-५० षटके याप्रमाणे खेळवण्यात येते.
आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
प्रत्येक विजयासाठी २ गुण, तर लढत रद्द झाल्यास १ गुण देण्यात येईल. एका संघाला गटात तीनच सामने खेळायचे असल्याने एखादा पराभवही घातक ठरू शकतो.
भारताचे सामने दुबईत, तर अन्य संघांचे सामने अनुक्रमे कराची, लाहोर, रावळपिंडी येथे होतील. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होतील.
गटवारी
अ-गट : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश
ब-गट : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान
भारताचे साखळी सामने
वि. बांगलादेश (गुरुवार, २० फेब्रुवारी)
वि. पाकिस्तान (रविवार, २३ फेब्रुवारी)
वि. न्यूझीलंड (रविवार, २ मार्च)