भारत-पाकिस्तानमधील लढतीबाबत संभ्रम कायम; यंदाची आशिया चषक स्पर्धा अमिरातीत, बीसीसीआयचा निर्णय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. मात्र या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबतीत अद्याप संभ्रम कायम आहे.
(Photo - @ICC/X)
(Photo - @ICC/X)
Published on

नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. मात्र या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबतीत अद्याप संभ्रम कायम आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) गुरुवारी ढाका येथे बैठक झाली. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ऑनलाइन बैठकीसाठी उपस्थित होते. तसेच बांगलादेश, पाकिस्तान व श्रीलंका या देशांतील क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी ढाका येथे या सभेसाठी दाखल झाले होते. ५ ते २१ सप्टेंबर या काळात भारतात आशिया चषकाचे आयोजन होणे अपेक्षित आहे. कारण पुढील वर्षी भारतातच टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने आशिया चषक हा टी-२० प्रकारातंच आशियाई देशांना सराव व्हावा, या हेतूने खेळवण्यात येणार होता. मात्र पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही, हे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे भारतही कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जात नाही. आयसीसीने दोन्ही देशांत २०२७ पर्यंत त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा करार केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध फार खराब असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नुकताच भारताने लिजंड्स चॅम्पियनशीप लीगमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारताने फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच पाकिस्तानविरुद्ध खेळावे, अशी मागणी देशभरातील चाहत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता आशिया चषकातसुद्धा भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील की नाही, याविषयी साशंका आहे.

“आशिया चषकाचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे बीसीसीआय जो निर्णय घेईल, तो अन्य देशांना मान्य करावा लागेल. विविध आव्हानांचा विचार करता अमिरातीत आशिया चषकाचे आयोजन करणे अधिक सोयीचे ठरेल. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळू शकतो. मात्र अद्याप याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही,” असे एसीसीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजित साइकिया यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला अधिकृतपणे जाहीर करेपर्यंत कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. स्पर्धेचे ठिकाण जवळपास पक्के असले, तरी याबाबतीत काही सहभागी देशांचे एकमत झालेले नाही. एकंदर आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वांचे मत जाणून क्रिकेटच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही साइकिया म्हणाले.

काय आहे भारत-पाकिस्तानचा करार?

  • मार्च महिन्यात पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले. मात्र भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे तो सामनाही दुबईतच झाला. या स्पर्धेच्या पूर्वी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांची आयसीसीशी बैठक झाली. त्यानुसार दोन्ही संघांमध्ये करार करण्यात आला.

  • आता २०२७पर्यंत भारताचे पुरुष अथवा महिला संघ पाकिस्तानमध्ये एखादी आयसीसी स्पर्धा असली, तरी तेथे जाणार नाहीत. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा संघही भारतातील आयसीसी स्पर्धेसाठी येथे येणार नाही. त्यामुळे यंदा ऑक्टोबरमध्ये महिलांचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होत असला, तरी पाकिस्तानचा संघ त्यांचे सामने कोलंबोत खेळणार आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ अन्य देशात त्यांचे सामने खेळेल.

logo
marathi.freepressjournal.in