भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे अवघ्या जगाचे लक्ष

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात बराच वेळ चर्चा झाली
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे अवघ्या जगाचे लक्ष

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत करून सुपर-४मध्ये स्थान मिळविल्यामुळे रविवारी पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून वेगवेगळ्या व्यूहरचना आखल्या जात आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. जडेजा दुखापतीमुळे बाहेर झाल्याने अधिक चांगली रणनीती आखावी लागणार आहे. कोणतीही कसर राहू न देण्याचा कर्णधार रोहितचा उद्देश आहे. गेल्या रविवारी २८ ऑगस्ट रोजी झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळविला होता. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भारताच्या हार्दिक पंड्या-रवींद्र जडेजा या जोडीने दमदार फलंदाजी करत विजय खेचून आणला होता. त्यांच्याकडून याच सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. हाँगकाँगविरुद्ध तुफानी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून भारताला मोठ्या अपेक्षा असल्याने त्यानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोरदार सराव केला आहे. हाँगकाँगविरुद्ध हार्दिक पंड्याला विश्रांती देऊन संघात समाविष्ट करण्यात आलेल्या ऋषभ पंतनेही सरावावर खूपच मेहनत घेतली आहे. के एल राहुल कर्णधार रोहितसोबत सलामीला खेळण्याची शक्यता आहे; मात्र राहुल त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसल्याने काहीशी चिंता वाटत आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला संधी खेळेल, असा अंदाज आहे. सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळणार असल्याचे सांगण्यात येते. अष्टपैलू हार्दिक पंड्याला पाचव्या क्रमांकावर पाठविले जाण्याचे संकेत आहेत. दिनेश कार्तिकने आपल्या खेळाने मोठा प्रभाव पाडल्याने यष्टिरक्षकाचा भार तोच उचलण्याची शक्यता आहे. त्याचा अफाट अनुभव भारताला उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे वाहतील. या खेळाडूंमध्ये डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करण्याची क्षमता भारताला अपेक्षित निकाल मिळवून देण्यात सहाय्यकारक ठरू शकते. खराब फॉर्मशी झुंजणाऱ्याआवेश खानच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते, असे सांगण्यात येते. फिरकीची जबाबदारी युझवेंद्र चहलवर सोपविली जाण्याची चिन्हे आहेत. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in