भारत-पाकिस्तान आज महायुद्ध! टी-२० विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने, बहुप्रतिक्षीत लढतीवर पावसाचे सावट

भारतीय संघ पाकिस्तानला नमवून विश्वचषकाच्या अभियानाचा विजयारंभ करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
भारत-पाकिस्तान आज महायुद्ध! टी-२० विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने, बहुप्रतिक्षीत लढतीवर पावसाचे सावट

मेलबर्नच्या रणभूमीत रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील महाद्वंद्व पाहण्यासाठी अवघ्या जगभरातील क्रीडारसिक सज्ज झाले आहेत. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी जेव्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील, तेव्हा साहजिकच देशवासियांच्या नजरा टीव्हीकडे वळतील. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानला नमवून विश्वचषकाच्या अभियानाचा विजयारंभ करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

एक लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) ही लढत होणार असून, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांचा हिरमोडही होऊ शकतो, मात्र कमी षटकांचा सामना झाला तरी त्यातील थरार तसूभरही कमी होणार नाही, हे तितकेच खरे. त्यातच गेल्या विश्वचषकातील आणि आशिया चषकातील पराभवाचा वचपा घेण्याची ही रोहितच्या सेनेकडे सुवर्णसंधी असल्याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, विश्वचषकातील सुपर-१२ फेरीला शनिवारपासून प्रारंभ झाल्यानंतर रविवारी भारत-पाकिस्तान आपापल्या अभियानाची सुरुवात करतील. भारत, पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या संघांचा दुसऱ्या गटात समावेश आहे, तर पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान ,आयर्लंड हे संघ आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासिम, नसीम शाह, शादाब खान, शान मसूद, उस्मान कादिर. शाहीन आफ्रिदी.

सलामीवीरांपासून धोका

पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यापासून भारतीय गोलंदाजांना सावध राहावे लागेल. विशेषत: रिझवान गेल्या काही महिन्यांपासून तुफान फार्मात असून, भारताविरुद्ध तो नेहमीच उत्तम योगदान देतो. फखर झमान या लढतीला मुकणार असून, शान मसूदच्या खेळण्यावरही संभ्रम आहे. आसिफ अली, इफ्तिकार अहमद यांच्यावर हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करण्याची मदार असेल.

वेगवान त्रिकुटापासून सावध

शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटापासून भारताच्या प्रामुख्याने आघाडीच्या फळीला सावध राहावे लागेल. गतवर्षी आफ्रिदीने विश्वचषकात भारताची भंबेरी उडवली. त्याशिवाय फिरकीपटू मोहम्मद नवाझ आणि शादाब खान मधल्या षटकांत धावा रोखण्यासह बळी पटकावण्यात पटाईत आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ नक्कीच सामन्यातही यश संपादन करेल.

फलंदाज अधिक लयीत

भारताचे फलंदाज पूर्ण लयीत असून, गोलंदाजीच्या तुलनेत हीच भारताची जमेची बाजू आहे. सूर्यकुमार यादव सातत्याने धावा करत असून, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक यांनीही सराव सामन्यात दमदार फटकेबाजी केली. कर्णधार रोहित आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी मोर्चा सांभाळण्याचे कार्य योग्यपणे पार पाडले, तर भारतीय संघ नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकेल अन्यथा लक्ष्याचा यशस्वी पाठलागही करू शकेल.

गोलंदाजीच्या पंचकाविषयी उत्सुकता

भारताच्या गोलंदाजीच्या पंचकात मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांचे स्थान पक्के मानले जात आहे, मात्र अन्य दोन स्थानांसाठी अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, अक्षर पटेल यांच्यात चुरस आहे. त्याशिवाय रविचंद्रन अश्विनच्या रूपात अनुभवी ऑफस्पिनरचा पर्यायही भारतापुढे उपलब्ध आहे. मेलबर्नची खेळपट्टी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला नेहमी फलदायी ठरली आहे. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

श्रीलंका विरुध्द आयर्लंड सामना

ठिकाण : बेल्लेरिव्ह ओव्हल, होबार्ट

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in