हरारे : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे उभय संघांतील दुसरा सामना रंगणार असून या लढतीत भारतीय फलंदाजांकडून पुन्हा धडाकेबाज कामगिरी अपेक्षित आहे.
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने १९ चेंडूंत साकारलेल्या ५० धावांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी व ४० चेंडू राखून धुव्वा उडवला. भारताने तब्बल ४ महिन्यांनी एखादी टी-२० लढत जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी मार्च महिन्यात भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला धूळ चारली होती. तसेच श्रेयसच्या नेतृत्वात सलग सहा पराभवानंतर भारताचा हा पहिलाच विजय ठरला. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला एकही विजय मिळवता आलेला नव्हता. वेगवान गोलंदाज मयांक यादव (१८ धावांत २ बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र आयर्लंडविरुद्ध ०-२, तर इंग्लंडविरुद्ध ०-४ अशा फरकाने भारताला टी-२० मालिका गमवावी लागली. प्रशिक्षक गौतम गंभीरवरही या पराभवाचे खापर फोडण्यात आले आहे. आता या दौऱ्यासाठी गंभीर विश्रांतीवर असल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लबवर दुसऱ्या लढतीतही वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित आहे. अशा स्थितीत मयांक, प्रिन्स यादव व अशोक शर्मा यांचे त्रिकुट प्रभावी कामगिरी करू शकते. फिरकीपटू रवी बिश्नोईनेदेखील लय गवसल्याचे संकेत दिले. वैभवने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. मात्र तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे १४, १३, १५ अशा धावा केल्या. मात्र वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्याच लढतीत चमक दाखवली. आता तिलक वर्मा व श्रेयसकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, अशोक शर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, इशान किशन, प्रभसिमरन सिंग, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, मयांक यादव, यश ठाकूर.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, टनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ले मधेवेरे, ताडिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, ब्लेसिंग मुझरबानी, डायन मेयर्स, रिचर्ड एन्गरावा, न्यूमन न्यामुरी, मिल्टन शुंबा, ताफाझ्वा सिगा.
वेळ : दुपारी ४.३० वाजता
थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स वाहिनी आणि फॅनकोड ॲप