भारतामुळे कसोटीला नवसंजीवनी! प्रशिक्षक गंभीरचे स्पष्ट मत; युवा खेळाडूंसह कर्णधार गिल, सिराजचे विशेष कौतुक

नव्या दमाच्या भारतीय संघात अखेरच्या क्षणापर्यंत लढा देऊन जिंकण्याची जिद्द आहे. हा संघ कधीच कोणापुढे शरणागती पत्करणार नाही. भारताने इंग्लंडविरुद्ध दिलेल्या झुंजीमुळेच कसोटी क्रिकेटला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे, असे रोखठोक मत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.
भारतामुळे कसोटीला नवसंजीवनी! प्रशिक्षक गंभीरचे स्पष्ट मत; युवा खेळाडूंसह कर्णधार गिल, सिराजचे विशेष कौतुक
Photo : X (BCCI)
Published on

लंडन : नव्या दमाच्या भारतीय संघात अखेरच्या क्षणापर्यंत लढा देऊन जिंकण्याची जिद्द आहे. हा संघ कधीच कोणापुढे शरणागती पत्करणार नाही. भारताने इंग्लंडविरुद्ध दिलेल्या झुंजीमुळेच कसोटी क्रिकेटला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे, असे रोखठोक मत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.

शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने सोमवारी पाचव्या कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने कसोटीच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी धावांच्या फरकाने यश संपादन केले. याबरोबरच भारताने पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताने दिलेल्या ३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ एकवेळ ३ बाद ३०१ अशा सुस्थितीत होता. मात्र मोहम्मद सिराजने केलेल्या प्रभावी माऱ्याला अन्य गोलंदाजांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने इंग्लंडचा डाव ३६७ धावांत गुंडाळला. सिराजला सामनावीर, तर एकूण ४ शतके झळकावणाऱ्या गिलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताने सलग दुसऱ्यांदा इंग्लंडला कसोटी मालिकेत बरोबरीत रोखले.

“आम्ही काही सामने गमावू, तर काही जिंकू. मात्र आम्ही कधीच हार मानणार नाही,” असे ट्वीट गंभीरने केले. तसेच सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने भारताच्या कामगिरीवर दिलखुलास भाष्य केले. “या संघात सर्व खेळाडू समान असून ते कोणत्याही स्थितीतून सामना जिंकू शकतात,” असे गंभीर म्हणाला.

“भारतासाठी प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीची काळजी घेण्यासह मैदानात तो फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही क्षेत्रात कसे योगदान देईल, याला आम्ही प्राधान्य देतो. संघनिवडीवर काही जण आक्षेप घेणे स्वाभाविक आहे. मात्र यामुळे संघातील खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत नाही,” असेही गंभीरने सांगितले.

“संपूर्ण मालिकेत गिलने कर्णधार म्हणून त्याच्यातील लौकिक दाखवले. यशस्वी जैस्वाल, राहुल, पंत यांनी फलंदाजीत छाप पाडली. बुमराच्या अनुपस्थितीत सिराजने गोलंदाजीची धुरा वाहिली. सुंदर व जडेजा यांचे अष्टपैलू योगदानही विसरता येणार नाही. त्यामुळे जवळपास सर्वच खेळाडूंच्या योगदानामुळे ही मालिका रंगतदार झाली. आम्ही इंग्लंडला त्यांच्याच मैदानात बरोबरीत रोखल्याचे समाधान आहे,” असे गंभीरने नमूद केले.

आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. परिणामी रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन असे तारांकित खेळाडूही एकामागोमाग कसोटीतून निवृत्त झाले. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने तंदुरुस्तीच्या कारणास्तव कर्णधारपद नाकारले. त्यामुळे गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.

गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. २०२१-२२च्या मालिकेतसुद्धा भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भारताने पिछाडीवरून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे पाचव्या कसोटीतील विजय खास आहे. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर १८ वर्षांपासून भारताला येथे मालिका विजयाची प्रतीक्षा आहे.

टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमारचा तीन महिन्यांनी सराव

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव तीन महिन्यांनी मंगळवारी सराव करताना आढळला. आयपीएलच्या क्वालिफायर-२मध्ये मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. १ जून रोजी ही लढत झाली होती. त्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला. त्यामुळे टी-२० संघातील सर्व खेळाडू विश्रांतीवर होते. त्यातच सूर्यकुमारवर जुलै महिन्यात जर्मनी येथे स्पोर्ट्स हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता सूर्यकुमार पुन्हा सरावाकडे वळला आहे. मंगळवारी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सूर्यकुमार सराव करताना दिसला. भारताचा बांगलादेश दौरा स्थगित झाला असला, तरी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकाच्या निमित्ताने हळूहळू भारताचे टी-२० संघातील खेळाडू बंगळुरूत तयारीसाठी दाखल होतील. तेथे १० ते १५ दिवसीय शिबिर होणार आहे. ९ सप्टेंबरपासून आशिया चषक सुरू होईल. १४ तारखेला भारत-पाकिस्तान यांच्यात दुबईत सामना होणार आहे.

बांगलादेश दौरा आता थेट पुढील वर्षी

भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता. मात्र सध्या हा दौरा थेट पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध १७, २० व २३ ऑगस्ट रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार होता. त्यानंतर २६, २९ व ३१ ऑगस्ट रोजी उभय संघांत ३ टी-२० मालिका होणार होत्या. मात्र बांगलादेशमधील सध्याचे वातावरण पाहता दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी हा दौरा रद्द केला. राजकीय अस्थिरता पसरल्याने बांगलादेशमध्ये सध्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे बांगलादेश क्रिकेटची अवस्था बिकट आहे.

logo
marathi.freepressjournal.in