
राजगिर (बिहार) : अभिषेक, हरमनप्रीत, सुखजित सिंग, रोहिदास यांच्या शानदार गोलच्या बळावर सोमवारी भारताने कझाकस्तानला १५-० असे एकतर्फी पराभूत करत पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने विजयी हॅटट्रीक नोंदवली. या विजयासह ९ गुणांसह भारताने ‘अ’ गटातील अव्वल स्थानासह स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये प्रवेश केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने दुबळ्या कझाकस्तानविरुद्ध आक्रमक खेळ केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला अभिषेकने प्रतिस्पर्धी संघाची गोलपोस्ट भेदत पहिला गोल केला. त्यानंतर पुन्हा ३ मिनिटाने अभिषेकने कझाकस्तानला दुसरा धक्का दिला. पहिल्या सत्र संपायला आले असतानाच सुखजित सिंगने भारताच्या गोलमध्ये भर घातली. त्यामुळे पहिल्या सत्राअखेर भारताने ३-० अशी मजबूत आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रातही भारताचे आक्रमण कायम होते. अभिषेकने पुन्हा एकदा गोल डागत वैयक्तिक तिसरा आणि भारतासाठी चौथा गोल केला. २४ आणि २६ व्या मिनिटाला अनुक्रमे जुगराज सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल डागत भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. २९ व्या मिनिटाला अमित रोहिदासने आपल्या गोलचे खाते उघडत भारताची आघाडी मजबूत केली. मध्यांतराला ७-० अशी अभेद्य आघाडी भारताने घेतली होती.
तिसऱ्या सत्रात भारताचे आक्रमण अधिक धारदार झाले. जुगराज सिंग, राजिंदर सिंग, सुखजित सिंग (२ गोल) यांनी तिसरे सत्र गाजवले.
सुरुवातीपासूनच भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला मान वर करण्याची संधीच दिली नाही. एकामागोमाग एक गोल झाल्याने कझाकस्तानचा संघ दबावाखाली आला. आणि त्यातून बाहेर निघणे शेवटपर्यंत त्यांना जमले नाही.
भारताने ‘अ’ गटातील तिन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने कझाकस्तानला १५-० ने पराभूत करत आशिया कप हॉकी स्पर्धेच्या गटातील सर्व लढती जिंकण्याची कामगिरी केली. अभिषेकने ५व्या, ८व्या, २०व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल केले. सुखजीत सिंगने १५व्या, ३२व्या आणि ३८व्या मिनिटाला असे तीन गोल केले. जुगराज सिंगने २४व्या, ३१व्या आणि ४७व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाची गोलपोस्ट भेदली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने २६व्या, अमित रोहिदासने २९व्या, राजिंदर सिंगने ३२व्या, संजय सिंगने ५४व्या आणि दिलप्रीत सिंगने ५५ व्या मिनिटाला भारतासाठी गोल केले.
पूल अ मध्ये अव्वल असलेल्या भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये चार गोल केले आणि कझाकस्तानवर ७-० ने आघाडी घेतली होती. त्यावेळी अभिषेकने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीस तीन गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली.
अभिषेकसह सुखजीत आणि जुगराज यांनी देखील या एकतर्फी सामन्या दरम्यान हॅटट्रिक केली. भारताने त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांत चीन आणि जपान यांना पराभूत केले आहे. या स्पर्धेतील विजेता पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे.
स्पर्धेत आतापर्यंत भारताने शानदार कामगिरी केली आहे. गटातील तिन्ही लढतीत भारताने प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली आहे. त्यामुळे या संघाने अव्वल स्थानासह सुपर ४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
मलेशिया, कोरियाचा सुपर ४ मध्ये प्रवेश
मलेशिया आणि कोरिया यांनी सोमवारी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘ब’ गटातील आपापले सामने जिंकून सुपर ४ गटात सहज प्रवेश केला. मलेशियाने चायनीज तैपईला १५-० असे एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात मलेशियाने प्रतिस्पर्धी चायनीज तैपईला मान वर काढण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीपासूनच त्यांनी सामन्यावर पकड मिळवत शेवटपर्यंत ती टिकवून ठेवली होती. मलेशियाने आक्रमक खेळ करताना आपला बचावही भेदू दिला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही.
स्पर्धेतील अन्य लढतीत कोरियाने बांगलादेशवर ५-१ असा सहज विजय मिळवला. सामन्यात कोरियाने बांगलादेशला आपल्या ताब्यात ठेवले होते. मलेशियाने तिन्ही सामने जिंकून गटातून अव्वल स्थान पटकावले. ६ गुणांसह कोरिया दुसऱ्या स्थानी आहे.
बांगलादेश ३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चायनीज तैपईच्या संघाला स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत ते अखेरच्या स्थानी आहेत. त्यांना गुणांचा भोपळाही फोडता आलेला नाही.
मलेशियाने अश्रम हमसानी (८व्या मिनिटाला, १५व्या मिनिटाला, ३२व्या मिनिटाला आणि ५४व्या मिनिटाला) ४ गोल केले. अखिमुल्लाह अनुअरने (१०व्या, २०व्या, २९व्या, ४५व्या आणि ५६व्या मिनिटाला) ५ गोल केले. नोरसायफीक सुमंत्रीने (२०व्या, ४०व्या आणि ६०व्या मिनिटाला) ३ गोल केले. अबु कमल अझराई (२२ व्या मिनिटाला), अँडीवालफीअन (२४ व्या मिनिटाला) आणि आयमन रोझेमी (३२व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला.