

कटक : पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला प्रारंभ करणार आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या पुनरागमनाकडे विशेष लक्ष असेल.
सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने के. एल. राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात तसेच राहुलच्या नेतृत्वात भारताने उत्तम कामगिरी केली.
आता मोर्चा भारताच्या प्रामुख्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टी-२० मालिकेकडे वळेल. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारताला आफ्रिकेविरुद्ध ५, तर न्यूझीलंडविरुद्धही ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मायदेशातील या १० लढतींद्वारे भारताला विश्वचषकासाठी आपले सर्वोत्तम १५ खेळाडू निवडण्याची संधी आहे. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात आफ्रिकेला नमवूनच टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र आता रोहित, विराट हे टी-२० संघाचा भाग नसल्याने भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही, हे विशेष. गेल्या २६ टी-२० सामन्यांत भारताने त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून आफ्रिकेविरुद्धही कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. त्यातच उपकर्णधार गिल या मालिकेसाठी संघात परतल्याने फलंदाजी बळकट होईल.
२६ वर्षीय गिलला नोव्हेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मानेला दुखापत झाली. त्यामुळे गिल दुसरा कसोटी सामना व एकदिवसीय मालिकेला मुकला. गिल हा भारताच्या कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार, तर टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गिलने तंदुरुस्ती सिद्ध केली. रिंकू सिंग व नितीश रेड्डी यांना मात्र संघातून यावेळी वगळण्यात आले आहे. ते दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० संघाचा भाग होते.
फलंदाजीच्या क्रमाची उत्सुकता
भारतीय संघात फक्त अभिषेक शर्मा व गिल यांचे स्थान सलामीला पक्के मानले जात आहे. तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणता फलंदाज कोणत्या स्थानी येईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या मालिकेत तरी भारतीय संघ ठराविक फलंदाजी क्रमानुसार जाणार का, हे पाहणे रंजक ठरेल. सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक, शिवम दुबे, अक्षर अशी फलंदाजी भारताच्या ताफ्यात आहे. यष्टिरक्षकासाठी संजू सॅमसन व जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जितेशला संधी देण्यात आली होती. तिलकला आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीतील १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ४ धावांची, तर सॅमसनला ५ धावांची गरज आहे. गोलंदाजी बुमराच्या साथीने हर्षित राणा किंवा अर्शदीप सिंगपैकी एकाला संधी मिळेल. कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांची फिरकी जोडी एकत्रित खेळल्यास आफ्रिकेला धावा करणे कठीण जाऊ शकते.
मार्करमच्या नेतृत्वात आफ्रिका सज्ज
२०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीनंतर प्रथमच भारत-आफ्रिका यांच्यात एखादी टी-२० लढत होणार आहे. त्यावेळीही एडीन मार्करम आफ्रिकेचा कर्णधार होता. आता मार्करमच्या नेतृत्वात हा संघ पुन्हा एकदा भारताला कडवी झुंज देण्यास उत्सुक आहे. २०१५मध्ये आफ्रिकेने भारतात अखेरची टी-२० मालिका जिंकली होती. डेवाल्ड ब्रेविस, कॉर्बिन बोश, क्विंटन डीकॉक, ट्रिस्टन स्टब्स असे फलंदाज आफ्रिकेच्या ताफ्यात आहेत. शिवाय गोलंदाजीत मार्को यान्सेन लयीत असून आनरिख नॉर्किएसुद्धा दीड वर्षांनी संघात परतला आहे. फिरकी विभागाची धुरा केशव महाराजकडे असेल. रायन रिकल्टन व नांद्रे बर्गर मात्र या संघाचा भाग नाहीत.
हार्दिक, बुमरा परतणार अन् शतक साकारणार?
३२ वर्षीय अष्टपैलू हार्दिक पंड्यासुद्धा अडीच महिन्यांनी भारतीय संघात परतणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेद्वारे संघात परततील. दोघांनाही आफ्रिकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. मुख्य म्हणजे बुमराला टी-२० कारकीर्दीतील १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी १ विकेटची गरज आहे, तर हार्दिकला बळी शतकासाठी २ विकेट्स हव्या आहेत. त्यामुळे दोघांनाही या मालिकेत शतकाची संधी आहे. हार्दिक हा सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत जायबंदी झाला होता. बंगळुरू येथे हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केली. मग मुश्ताक अली स्पर्धेत पंजाबविरुद्ध ४२ चेंडूंत नाबाद ७७ धावा फटकावून बडोद्याला २०० धावांचे लक्ष्य पार करून दिले. हार्दिकच्या पुनरागमनामुळे टी-२० संघाचा समतोल साधला जाईल.