IND vs BAN: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; युवा मयांकला संधी, वरुणही परतला

‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जवळपास सर्व खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवचे संग्रहित छायाचित्र
कर्णधार सूर्यकुमार यादवचे संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मयांक यादवला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जवळपास पाच महिन्यांचा पुर्नवसन कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात केवळ एकच वरिष्ठ खेळाडू हार्दिक पंड्याचा समावेश आहे. ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जवळपास सर्व खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथील निराशाजनक टी-२० विश्वचषकाच्या तीन वर्षांनी संघात स्थान मिळाले आहे. पंड्या व शिवम दुबेनंतर अष्टपैलू नितीश रेड्डीलाही संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे त्याला झिम्बाब्वे दौऱ्याला मुकावे लागले होते. रियान पराग, अभिषेक शर्मा, हर्षित राणासारख्या खेळाडूंची १५ सदस्यीय संघात वर्णी लागली आहे. संघात संजू सॅमसननंतर जितेश शर्मा दुसरा यष्टिरक्षक असेल.

मयांकला संघात स्थान मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याने ‘आयपीएल’च्या चारपैकी तीन सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्ससाठी सातत्याने १५० किमी प्रति तासच्या वेगाने गोलंदाजी केली. त्यामुळे त्याने सलग सामनावीराचा पुरस्कार पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. ‘आयपीएल’दरम्यान झालेल्या पोटाच्या दुखापतीनंतर त्याला उर्वरित सामन्यांना मुकावे लागले होते. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दरदिवशी १४ ते १५ षटके गोलंदाजी करत आहे. रणजी करंडक स्पर्धेपूर्वी यादव केवळ चार षटके गोलंदाजी करण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला कसे जुळवून घेतो, हे जाणून घेण्याची संधी राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे असणार आहे.

भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयांक यादव.

logo
marathi.freepressjournal.in