

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज के. एल. राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने राहुलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना खेळताना पाहण्याची संधी मिळेल.
आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांत गुवाहाटी येथे दुसरी कसोटी सुरू आहे. त्यानंतर उभय संघांत ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. अजित आगरकरच्या अध्यक्षपदाखाली निवड समितीने रविवारी एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला.
महाराष्ट्राचा २८ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडचे पुनरागमन झाले आहे. भारताकडून ६ एकदिवसीय व २३ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव असलेला ऋतुराज शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. मात्र यंदा रणजी हंगामात तसेच भारत-अ संघाकडून आफ्रिका-अ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केल्याचे फळ ऋतुराजला मिळाले आहे. तसेच गिल व श्रेयसच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल व तिलक वर्मा यांनाही भारतीय संघात स्थान लाभले आहे.
भारताचा संघ
के. एल. राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.