आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारत अंतिम फेरीत; श्रीलंकेविरुद्ध आज प्रयोगाची संधी!

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी रात्री थाटात आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सुपर-फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारत अंतिम फेरीत; श्रीलंकेविरुद्ध आज प्रयोगाची संधी!
Published on

दुबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी रात्री थाटात आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सुपर-फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. आता शुक्रवारी भारताची अखेरच्या लढतीत श्रीलंकेशी गाठ पडेल. या लढतीत भारताला प्रयोग करण्याची संधी असेल.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगत आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तानने, तर ब-गटातून श्रीलंका, बांगलादेशने सुपर-फोर फेरी गाठली.

भारताने सुपर-फोर फेरीतील पहिल्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारली होती. मग बुधवारी भारताने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या. अभिषेक शर्माने पुन्हा एकदा वादळी खेळी साकारताना ६ चौकार व ५ षटकारांसह ३७ चेंडूंत ७५ धावा फटकावल्या. त्याने व शुभमन गिल यांनी ३८ चेंडूंत ७७ धावांची सलामी नोंदवली. मात्र त्यानंतर भारताचा डाव घसरला. अभिषेक धावचीत झाला, तर सूर्यकुमार (५), शिवम दुबे (२), तिलक वर्मा (५) यांनी निराशा केली. हार्दिक पंड्याने २९ चेंडूंत ३८ धावा फटकावून भारताला १६८ धावांपर्यंत नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ मात्र १९.३ षटकांत १२७ धावांत गारद झाला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने १८ धावांत ३, तर वरुण चक्रवर्ती व जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. सैफ हसनने ५१ चेंडूंत ६९ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र बांगलादेशचे ११ पैकी ९ फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतापुढे बांगलादेश किंवा पाकिस्तानचे आव्हान असेल.

अभिषेक शर्मा -

  • ३७ चेंडू

  • ६ चौकार

  • ५ षटकार

  • वेळ : रात्री ८ वाजता

  • थेट प्रक्षेपण : टेन ३ आणि सोनी लिव्ह ॲप

logo
marathi.freepressjournal.in