
कोलंबो : संथ खेळपट्टीमुळे फलंदाजांना धावांसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि श्रीलंकेच्या फिरकीसमोर उडणारी दाणादाण यांचा सामना करण्याचे आव्हान रविवारी होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासमोर आहे.
कोलंबोच्याच खेळपट्टीवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही आघाड्यांवर चांगली सुरुवात करूनही सामना आपल्या बाजूने वळविण्यात भारताला अपयश आले. अवघ्या २३१ धावांचे आव्हान परतवून लावताना कर्णधार रोहित शर्माने भारताला मनाजोगती सुरुवात करून दिली होती. अखेरच्या काही षटकांत श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
पहिल्या सामन्यात भारताच्या विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही त्यांना त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आलेले नाही. त्याचा फायदा यजमानांना झाला. निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यात भारतीय संघाला अपयश आल्याने पहिल्या सामन्यात यशाने किंचीतशी मान वळवली. वानींदू हसरंगा, चरिथ असलंका आणि दुनिथ वेलालेथ या फिरकीसमोर धावा जमविण्याचे आणि विकेट न देण्याचे आव्हान भारतासमोर आहे. त्यात यश आल्यास सामन्यात बाजी मारण्यात भारताला नक्कीच यश येईल.