

कोलंबो : कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगत भारतीय संघ रविवारी येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीत विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. तीन वर्षानंतर परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
भारताने परदेशातील शेवटची कसोटी मालिका जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध मालिका बरोबरीत सुटल्या. या काळात घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून मिळालेल्या पराभवांमुळे भारतीय संघाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला होता. मात्र, गॉल येथील पहिल्या कसोटीत १६५ धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने काही प्रमाणात आपले स्थान मजबूत केले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघासाठी हा विजय दिलासा देणारा ठरला.
जर भारताने ही मालिका २-० अशी जिंकली, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) क्रमवारीत ५७.५८ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचण्याची भारताला संधी आहे. सध्या चौथ्या स्थानावर असलेला बांगलादेश संघ मॅके येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभूत झाल्यास ५५.५६ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर फेकला जाण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता, भारताला गिल आणि जैस्वाल यांच्याकडून मोठ्या धावांची गरज आहे. गिलने शेवटच्या सहा डावांमध्ये दोन शतके ठोकली असली तरी डाव्या हाताच्या संथ फिरकी गोलंदाजीसमोर तो अडचणीत सापडल्याचे दिसते. गॉल कसोटीत तो प्रभात जयसूर्याचा दोनदा बळी ठरला. कर्णधार म्हणून गिलने १० कसोटीत ७३ पेक्षा जास्त सरासरीने १,१०० धावा केल्या आहेत, ज्या त्याच्या पूर्वीच्या ३२ कसोटींमधील ३५ च्या सरासरीपेक्षा खूपच उत्तम आहेत.
दुसरीकडे यशस्वी जैस्वाल गेल्या आठ डावांत केवळ एक अर्धशतक करू शकला आहे. गॉल कसोटीत दुसऱ्या डावात असिता फर्नांडोच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. या चुकीवर मात करण्यासाठी जैस्वालने शुक्रवारी सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या नेटमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. गोलंदाजीच्या आघाडीवर कुलदीप यादवची गॉल कसोटीतील कामगिरी निराशाजनक राहिली. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर २५ षटकांत त्याला केवळ एक बळी मिळवता आला आणि त्याने प्रति षटक चारहून अधिक धावा दिल्या.
श्रीलंकेच्या दृष्टिकोनातून पाहता, त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना केवळ फटकेबाजी करण्यापेक्षा संयमी आणि चाणाक्ष फलंदाजी करत अधिक वेळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज आहे. वारंवार आक्रमक फटके खेळून बाद होण्याची मालिका त्यांना थांबवावी लागेल. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कामिल मिशारा आणि सहान अराचिगे यांचा संघात समावेश श्रीलंकेसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी आशा आहे. अन्यथा ही लढतसुद्धा एकतर्फी होईल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
श्रीलंकेला गेल्या १० वर्षांत भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या संघांविरुद्ध मायदेशात खेळलेली ही सलग सहावी मालिका आहे, ज्यात श्रीलंकेला विजय मिळवता आलेला नाही.
भारताविरुद्ध तर श्रीलंकेने २००८ नंतर कुठेही मालिका जिंकलेली नाही. पहिल्या कसोटीनंतर श्रीलंकेच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आणखी भर पडली आहे. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस अद्याप दुखापतीतून सावरलेले नाहीत, तर दिनेश चंडिमलला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले आहे.
कुलदीप की सारांशला संधी?
श्रीलंकेच्या संघात डाव्या हाताच्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने कुलदीपऐवजी ऑफ-स्पिनर सारांश जैनला संघात स्थान देण्याचा विचार होऊ शकतो. शुक्रवारी नेट सरावात कुलदीपची अनुपस्थिती ही त्याला वगळण्याचे संकेत असू शकते, परंतु अंतिम निर्णय खेळपट्टी पाहूनच घेतला जाईल. श्रीलंकेच्या संघाला मालिकेत पुनरागमन करायचे असल्यास त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांना संयमी खेळ करावा लागेल. यजमान संघाने फॉर्ममध्ये असलेल्या कामिल मिशारा आणि सहान अरच्चिगे यांचा संघात समावेश केला असून त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
खेळपट्टीचा अंदाज
कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स स्टेडियमची खेळपट्टी धीम्या गतीची असल्यामुळे फिरकीपटूंना चांगला टर्न मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन दिवसांनंतर खेळपट्टी आपले रागरंग दाखवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीलाच फलंदाजी करणे तुलनेने सोपे ठरू शकते. मात्र, काही वेळा चेंडूची उसळी खूपच कमी राहू शकते, त्यामुळे फलंदाजांसाठी मोठी धावसंख्या उभारणे आव्हानात्मक ठरणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत ४७कसोटी सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी २३ कसोटी भारताने जिंकल्या आहेत. श्रीलंकेला सात सामन्यांत विजय मिळवता आला असून १७कसोटी अनिर्णीतावस्थेत सुटल्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार),लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकीब नबी, सर्फराझ खान.
श्रीलंका : धनंजय डीसिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पासिंदू सूरियाबंदारा, कामिंदू मेंडिस, सहान अराचचिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांता, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायका, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, विश्व फर्नांडो.
वेळ : सकाळी १० वाजल्यापासून; थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क