

मुंबई : अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय उपकर्णधार शुभमन गिलचाही संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीच चमूने तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिल्यावरच तो उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकाविरुद्घ होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांसाठी बुधवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.
सध्या भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. ६ डिसेंबरला ही मालिका संपल्यानंतर ९ डिसेंबरपासून उभय संघांत ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल. भारतात फेब्रुवारीत रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर आता फक्त १० टी-२० सामने खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी उरले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ आफ्रिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध जानेवारीत ५ टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने तयारीच्या दृष्टीने निर्णायक ठरतील.
दरम्यान, ३२ वर्षीय हार्दिक हा सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत जायबंदी झाला होता. स्नायूंच्या दुखापतीमुळे तो जवळपास अडीच महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र बंगळुरू येथे बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केली. हार्दिकने २१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा काळ पूर्णपणे एनसीए येथे घालवून तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. त्यामुळे वैद्यकीय चमूने त्याला मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली. हार्दिकने मंगळवारीच पंजाबविरुद्ध ४२ चेंडूंत नाबाद ७७ धावा फटकावून बडोद्याला २०० धावांचे लक्ष्य सहज पार करून दिले. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे २६ वर्षीय गिलला नोव्हेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मानेला दुखापत झाली. त्यामुळे गिल दुसऱ्या कसोटीसह एकदिवसीय मालिकेला मुकला. गिल हा भारताच्या कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार, तर टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. गिलसुद्धा आता बंगळुरू येथे दाखल झाला आहे. त्याचा टी-२० संघात समावेश असला, तरी बीसीसीआय पुढील काही दिवसांत तंदुरुस्तीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेईल.
डावखुरा फलंदाज रिंकू सिंग व अष्टपैलू नितीश रेड्डी यांना मात्र संघातून यावेळी वगळण्यात आले आहे. ते दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० संघाचा भाग होते. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेद्वारे संघात परततील. दोघांनाही आफ्रिकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. यष्टिरक्षकासाठी संजू सॅमसन व जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे.
टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर. (गिलबाबतचा निर्णय तंदुरुस्ती चाचणीनंतर)