शमीचे पुनरागमन! बुमरा, सिराज, पंतला विश्रांती; इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जवळपास १४ महिन्यांनंतर इंग्लंडविरुद्धच्या टी- २० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रसौजन्य - (एक्स)
Published on

मुंबई : दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जवळपास १४ महिन्यांनंतर इंग्लंडविरुद्धच्या टी- २० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनीही संघातील स्थान निश्चित केले आहे.

२०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी अहमदाबाद येथे झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात शमीला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास १४ महिने तो संघाबाहेर होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज बराच कालावधी भारतीय संघाबाहेर आहे. दरम्यान मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी शमीचे पुनरागमन झाले आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर २२ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

विशेष म्हणजे यष्टीरक्षक आणि विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतला या संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना संघात संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अष्टपैलू अक्षर पटेललाही संघात जागा मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धुमाकूळ घातलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिका, त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत मोहम्मद शमीला संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पाचव्या सामन्यात बुमराला पाठीच्या दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला होता. बुमराचा सहकारी गोलंदाज मोहम्मद सिराजलाही या मालिकेत विश्रांती दिली आहे. सिराजने बॉर्डर गावस्कर मालिकेचे पाचही सामने खेळले होते. युवा वेगवान गोलंदाज मर्याक यादवही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. याच कारणामुळे गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याला संघाबाहेर बसावे लागले होते.

नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर मालिकेत जसप्रीत बुमराने अप्रतिम गोलंदाजी केली. मात्र त्याला दुसऱ्या गोलंदाजाची कमी भासली. त्यामुळे भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. गेल्या काही महिन्यांपासून शमीच्या फिटनेसबाबत स्पष्ट माहिती समोर येत नव्हती. बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे शमीच्या फिटनेसबाबत माहिती देण्याबाबत विनंती केली होती.

दरम्यान बॉर्डर-गावस्कर मालिकेत चमकदार कामगिरी करणारा फलंदाज नितीश कुमार रेड्डी यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे.

निवडकर्त्यांनी केवळ टी-२० संघाची निवड केली आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील ३ सामने ६, ९ आणि १२ फेब्रुवारीला होणार आहे. या मालिकेसाठी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड काही दिवसांनी केली जाणार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. मात्र या संघातून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भविष्याचा विचार करून या संघाची निवड केल्याचे दिसते.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक).

logo
marathi.freepressjournal.in