
बर्मिंगहॅम : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय कसोटी संघ सध्या स्थित्यंतराच्या स्थितीत आहे. त्यातच आता इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी योग्य खेळाडूंची निवड करण्याचा पेच भारतीय संघासमोर आहे. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवण्यासह पाच लढतींच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हानही भारतापुढे असेल.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागून आहे.
मात्र गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मुख्य म्हणजे भारताकडून या कसोटीत पाच शतके झळकावली गेली. परंतु अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण व सुमार गोलंदाजीचा भारताला फटका बसला. जसप्रीत बुमरावर अतिविसंबून राहणेही भारताला महागात पडले. इंग्लंडने ३७१ धावांचा पाचव्या दिवशी यशस्वी पाठलाग करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मुख्य म्हणजे गेल्या ९ कसोटींपैकी भारताने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी एजबॅस्टनवर चांगला खेळ करावा लागेल. तसेच बुमराच्या तंदुरुस्तीचा आढावा घेत त्यानुसार अन्य पर्यायांमधून गोलंदाजांची अचूक निवड करावी लागेल.
इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१-२२मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमरा भारताचा कर्णधार होता.
दुसरीकडे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडलासुद्धा आजपर्यंत एकदाही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठता आली नाही. मात्र त्यांनी यंदासुद्धा ‘बॅझबॉल’ शैली कायम राखून भारताला लीड्स येथे नमवले. इंग्लंडने पहिल्या कसोटीचाच संघ दुसऱ्या सामन्यासाठी कायम राखला आहे. आता हा संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन भारतावर आणखी दडपण टाकण्यास आतुर असेल.
दरम्यान, एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर साधारणपणे चौथ्या डावात २०० धावांचा पाठलाग करणेही कठीण जाऊ शकते. मात्र त्यासाठी हवामानाची साथ लाभणे आवश्यक आहे. हवामान काहीसे ढगाळ असेल, तर आपोआप फिरकीपटूंना सहाय्य मिळेल. अन्यथा फलंदाजांचेच लढतीवर वर्चस्व राहिल. लढतीच्या दोन-तीन दिवसांवर पावसाचाही प्रभाव राहील. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीस प्राधान्य देऊ शकतो. मात्र बॅझबॉलच्या शैलीत खेळणाऱ्या इंग्लंडने गेल्या काही वर्षांत धावांचा पाठलाग करण्यास प्राधान्य दिले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, आकाश दीप, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, अभिमन्यू ईश्वरन, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, करुण नायर, नितीश रेड्डी, प्रसिध कृष्णा, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
एजबॅस्टन भारतासाठी धोकादायी
दुसरी कसोटी जेथे होणार आहे ते एजबॅस्टन स्टेडियम भारतासाठी आतापर्यंत दुर्दैवी ठरले आहे. एजबॅस्टन येथील ८ पैकी ७ कसोटींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. २०२२मध्ये येथे भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी झाली होती. मात्र या कसोटीच्या चौथ्या डावात इंग्लंडने चक्क ३७८ धावांचे लक्ष्य गाठले. त्याशिवाय २०१८मध्ये भारताला येथे विराटच्या नेतृत्वात एका कसोटीत फक्त ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला.
कुलदीपला संधी, अर्शदीपही शर्यतीत?
मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार गिलने भारतीय संघ दोन फिरकीपटूंना खेळवण्याची संधी असल्याचे संकेत दिले. मात्र बुमरा खेळणार की नाही, हे लढतीच्या दिवशी सकाळी खेळपट्टी पाहूनच ठरवू, असेही तो म्हणाला. त्यामुळे बुमरा नसला, तर त्याच्या जागी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. तसेच प्रसिध कृष्णा व शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एकाला वगळून आकाश दीप किंवा अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताकडे नितीश रेड्डीचा अष्टपैलू पर्यायही उपलब्ध आहे. २० बळी मिळवण्यासाठी भारताने किमान ४ परिपूर्ण गोलंदाज व १ अष्टपैलू असे समीकरण वापरणे गरजेचे आहे.
पंत, राहुलवर फलंदाजीची भिस्त
पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावणारा यष्टिरक्षक ऋषभ पंत व सलामीवीर के. एल. राहुल यांच्यावर भारताची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. त्याशिवाय यशस्वी जैस्वाल, गिल यांनीही शतके साकारून लयीत असल्याचे दाखवून दिले. मात्र करुण नायर व साई सुदर्शन यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. विशेषत: दोन्ही डावांत भारताचे अखेरचे पाच फलंदाज ५० धावांच्या आत गारद झाले. त्यामुळे भारताला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
इंग्लंडला चिंता गोलंदाजांची
इंग्लंडकडे बेधडक फलंदाजांचा भरणा असून त्यांच्यासमोर कितीही धावांचे लक्ष्य कमी पडू शकते. बेन डकेट, ओली पोप यांनी गेल्या कसोटीत शतके झळकावली. तर जो रूट, कर्णधार स्टोक्स, जेमी स्मिथ हेसुद्धा लयीत आहेत. मात्र गोलंदाजी इंग्लंडसाठीही चिंतेची बाब आहे. भारताने दोन्ही डावांत त्यांच्याविरुद्ध ३५० धावांचा पल्ला गाठला. ख्रिस वोक्स वगळता जोश टंग व ब्रेडन कार्स यांना फारसा अनुभव नाही. तसेच पहिल्या कसोटीप्रमाणे दरवेळी भारताचे अखेरचे फलंदाज बाद होणार नाहीत.