

काकामिगहारा : आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. रविवारी पार पडलेल्या अ गटातील पहिल्याच सामन्यात भारताने इंडोनेशियाचा १३-१ असा दारुण पराभव केला.
भारतीय आक्रमक फळीसमोर इंडोनेशियाची बचावफळी पूर्णपणे हतबल झालेली पाहायला मिळाली. भारताच्या या मोठ्या विजयात आघाडीवीर दिलप्रीत सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत चार गोल लगावले. त्याने सामन्याच्या १८ व्या, १९ व्या, ३७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला मैदानी गोल केले. त्याच्याव्यतिरिक्त शिलानंद लाकरा (६ वे, ३५ वे मिनिट) आणि सुखजीत सिंग (३८ वे, ४८ वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. तर अभिषेक (१२ वे मिनिट), राजिंदर सिंग (१९ वे मिनिट), मनदीप सिंग (२१ वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२८ वे मिनिट) आणि जुगराज सिंग (४७ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात हातभार लावला. इंडोनेशियाकडून औलिया अल अर्द्ध याने ३३ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
सामन्याच्या ६ व्या मिनिटाला शिलानंद लाकराने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर १२ व्या मिनिटाला अभिषेकने, १८ व्या व १९ व्या मिनिटाला दिलप्रीतने, १९ व्या मिनिटाला राजिंदरने आणि २१ व्या मिनिटाला मनदीपने गोल करत भारताला ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. २७ व्या मिनिटाला मनप्रीत सिंगवर 'डी' मध्ये झालेल्या फाऊलमुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, मात्र हरमनप्रीतचा फटका इंडोनेशियाच्या गोलरक्षकाने रोखला. तरीही पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत हरमनप्रीतने मध्यंतरापर्यंत भारताला ७-० ने पुढे नेले.
उत्तरार्धात इंडोनेशियाने एक गोल केला, मात्र शिलानंदने आपला दुसरा गोल केल्यानंतर दिलप्रीतने हॅटट्रिक पूर्ण केली.