

मोकी (चीन) : भारतीय युवतींच्या संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानचा तब्बल १९-० असा फडशा पाडला. पूजा मलिकने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर भारताने थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा हा या स्पर्धेतील आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. आता शनिवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची दक्षिण कोरियाशी गाठ पडेल.
चीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने तब्बल १८ पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि एक पेनल्टी स्ट्रोकही प्राप्त केला. याउलट पाकिस्तान संघाला एकही गोल करता आला नाही, तसेच त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर किंवा पेनल्टी स्ट्रोक मिळवता आला नाही. भारताने पहिल्या मिनिटापासूनच सामन्यावर पकड मिळवत पहिल्या सत्रात ५, दुसऱ्या सत्रात ५, तिसऱ्या सत्रात ३ आणि अंतिम सत्रात ६ गोल झळकावले. सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांत भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सहाव्या मिनिटाला भारताने मारलेला गोल रेफरलमुळे रद्द झाला. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पूजा साहू हिने गोल करत भारताचे खाते उघडले. नवव्या मिनिटाला रोशनी ऐंद हिने मैदानी गोल करून आघाडी २-० केली, तर ११व्या मिनिटाला तनुश्री कडू हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
पाकिस्तानी खेळाडूने वर्तुळात फाऊल केल्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. १३व्या मिनिटाला सुखवीर कौर हिने या संधीचे सोने करत गोल केला. त्यापाठोपाठ सानिका माने हिने मैदानी गोल करत पहिल्या सत्राअखेर भारताला ५-० असे आघाडीवर ठेवले. दुसऱ्या सत्रात १६व्या मिनिटाला मधू सिदार हिने आणि १८व्या मिनिटाला गीता यादवने गोल नोंदवून आघाडी ७-० केली. २३व्या मिनिटाला सानिकाने वैयक्तिक दुसरा गोल केला.
२५व्या मिनिटाला तनुजा टोप्पो आणि २७व्या मिनिटाला पूजा मलिक हिने गोल करून मध्यंतरापूर्वी भारताला १०-० अशी एकतर्फी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला (३३ व्या मिनिटाला) पूर्णिमा यादव हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ११-० अशी स्थिती केली. ३९व्या मिनिटाला मधू सिदार आणि ४०व्या मिनिटाला सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवले.
चौथ्या सत्रात ४८व्या मिनिटाला कृष्णा शर्माने या स्पर्धेतील तिचा पहिला गोल केला. ४९व्या आणि ५१व्या मिनिटाला सलग गोल करत पूजा मलिक हिने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. ५४व्या मिनिटाला सुप्रियाने कॉर्नरवर दुसरा गोल केला, तर ५५व्या मिनिटाला बिनिमा धान हिने मैदानी गोल केला. अखेर ६०व्या मिनिटाला रोशनी हिने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
युवकांची आज मलेशियाविरुद्ध उपांत्य लढत
गतविजेत्या भारतीय युवा संघाची पुरुषांच्या विभागात शुक्रवारी उपांत्य लढतीत मलेशियाशी गाठ पडेल. भारतीय वेळेनुसार दुपारी २.१५ वाजता लढत सुरू होईल. तसेच आशियाई हॉकी महासंघाच्या यूट्यूब वाहिनीवर या लढतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. भारताने बुधवारी चायनीज तैपईचा १५-० असा फडशा पाडून थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.