

काकामिगहारा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने विजयी सलामी देताना ब गटातील पहिल्याच सामन्यात उझबेकिस्तानचा १९-० असा धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत उझबेकिस्तानच्या बचावफळीला पुरते हतबल केले.
भारताच्या या मोठ्या विजयात दीपिका हिने एकटीने तब्बल ८ गोल लगावले. तिने सामन्याच्या ८व्या, २२व्या, २५व्या, ३३व्या, ३६व्या, ३८व्या, ४१व्या आणि ५४व्या मिनिटाला गोल नोंदवले. तिच्याव्यतिरिक्त लालरेमसियामी (७ वे मिनिट), इशिका (११ वे, ४२ वे, ५४ वे मिनिट), बलजीत कौर (१२ वे मिनिट), नेहा (१८ वे मिनिट), नवनीत कौर (२३ वे, ४५ वे मिनिट), लालथांटलुआंगी (४३ वे, ५१ वे मिनिट) आणि साक्षी राणा (४३ वे मिनिट) यांनी गोल करत संघाच्या मोठ्या विजयात योगदान दिले.
सामन्याच्या पूर्वार्धातच भारताने ८-० अशी भक्कम आघाडी घेतली होती, तर उत्तरार्धात आणखी ११ गोल करत उझबेकिस्तानवरील आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. लालरेमसियामीने मैदानी गोल करत भारताचे खाते उघडले, तर सुनेलिता टोप्पोच्या पासवर इशिकाने दुसरा गोल केला. त्यानंतर दीपिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवला.
भारतीय गोलरक्षक आणि अनुभवी खेळाडू सविता पुनिया हिने या सामन्याद्वारे आपला ३२० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी खेळाडूंमध्ये ती आता वंदना कटारियासोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचली आहे. उझबेकिस्तानच्या खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याने सविताला फारशी परीक्षा द्यावी लागली नाही. भारतीय संघाचा पुढील सामना सोमवारी इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे.