नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताला पदकतालिकेत अव्वल स्थान

अंतिम सामन्यात चेक रिपब्लिकने भारताचा १५-१७ असा पराभव केला
नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताला पदकतालिकेत अव्वल स्थान

भारतीय नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्डकप २०२२मध्ये दमदार कामगिरी केल्याने भारताला पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. भारताने कोरियामधील चांगवॉन येथे सुरू असलेल्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात आतापर्यंत १५ पदके जिंकली. यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. बुधवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताच्या अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर यांनी रौप्यपदक जिंकले.

अंतिम सामन्यात चेक रिपब्लिकने भारताचा १५-१७ असा पराभव केला. अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर या तिघांनी पात्रतेच्या दोन फेऱ्या पार करत अंतिम फेरीत धडक मारली होती. पहिल्या फेरीत त्यांनी ८७२ गुण मिळवत दुसरे, तर दुसऱ्या फेरीत ५७८ गुण मिळवित पहिले स्थान पटकाविले होते.

अंतिम फेरीत या तिघांनी धडाकेबाज सुरुवात करत १०-२ अशी मोठी आघाडी घेतली होती; मात्र अनुभवी चेक रिपब्लिकची मार्टिन, टॉमास, मॅटेज या तिघांनी जोरदार मुसंडी मारली. यानंतर भारतीय युवा नेमबाजांनी सामन्यावरील नियंत्रण गमावले. सामना १५-१५ असा बरोबरीत आला. त्यानंतर अनुभवी चेक रिपब्लिकच्या नेमबाजांनी सामना जिंकून सुवर्णपदक जिंकले. भारताने २०१९ मध्ये आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये सर्वच्या सर्व पाच स्तर जिंकले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in