IND U19 vs ENG U19: वैभव सूर्यवंशीची पुन्हा फटकेबाजी; भारतीय युवा संघाला आघाडी

१४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने गुरुवारी पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली.
IND U19 vs ENG U19: वैभव सूर्यवंशीची पुन्हा फटकेबाजी; भारतीय युवा संघाला आघाडी
छाया सौजन्य : एक्स (@samastipurtown)
Published on

नॉर्दम्पटन : १४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने गुरुवारी पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने फटकावलेल्या ३१ चेंडूंतील ८६ धावांच्या बळावर भारतीय युवा संघाने (१९ वर्षांखालील) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ गडी आणि ३३ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने पाच लढतींच्या युवा एकदिवसीय मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

भारताचे तीन संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यांपैकी भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडशी कसोटी मालिका खेळत आहे. महिला संघांमध्ये टी-२० मालिका सुरू आहे. तर भारत-इंग्लंड यांच्या युवा संघांत ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. युवा संघांतील एकदिवसीय सामने हे प्रत्येकी ४० षटकांचे असतात. त्यांपैकी पहिल्या सामन्यात भारताने वैभवच्याच फटकेबाजीमुळे विजय मिळवला, तर दुसऱ्या लढतीत इंग्लंडने बाजी मारून मालिकेत बरोबरी साधली.

मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय युवा संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र डॉकिन्स (६२) व कर्णधार थॉमस रियू (नाबाद ७६) यांनी अर्धशतके झळकावल्याने इंग्लंडने ४० षटकांत ६ बाद २६८ धावांपर्यंत मजल मारली. फिरकीपटू कनिष्क चौहानने ३ बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३४.३ षटकांतच विजय मिळवला. वैभव आणि विहान मल्होत्रा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. वैभवने ६ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली. मुख्य म्हणजे एकाही सामन्यात तो ४५ पेक्षा कमी धावांवर बाद झालेला नाही. आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडून खेळताना वैभवने लक्ष वेधले होते. वैभव बाद झाल्यावर कनिष्क (नाबाद ४३) व अंब्रिश (नाबाद ३१) यांनी ६ बाद १९९ धावांवरून सातव्या विकेटसाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजयीरेषा ओलांडून दिली. शनिवारी चौथी लढत रंगणार आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत चार-चार दिवसांचे दोन कसोटी सामनेही होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in