'वैभव'शाली विजयासह जेतेपदाचा षटकार! आयुषच्या नेतृत्वात भारताच्या पोरांनी जिंकला अंडर-१९ वर्ल्डकप; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा

क्रिकेटच्या पटलावर शुक्रवारी संपूर्ण विश्वाने अवघ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक प्रताप पाहिला. वैभवने ८० चेंडूंत साकारलेल्या १७५ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारली.
'वैभव'शाली विजयासह जेतेपदाचा षटकार! आयुषच्या नेतृत्वात भारताच्या पोरांनी जिंकला अंडर-१९ वर्ल्डकप; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा
Photo : X
Published on

हरारे : क्रिकेटच्या पटलावर शुक्रवारी संपूर्ण विश्वाने अवघ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक प्रताप पाहिला. वैभवने ८० चेंडूंत साकारलेल्या १७५ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारली. या वैभवशाली विजयासह भारताने जेतेपदाचा षटकार लगावला. मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून हे यश साध्य केले.

हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या महाअंतिम मुकाबल्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. वैभवने चक्क १५ चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याला आयुषच्या (५१ चेंडूंत ५३) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यानंतर भारताने इंग्लंडला ४०.२ षटकांत ३११ धावांत गारद करून शतकी धावांच्या फरकाने विजय नोंदवला. शतकवीर कॅलेब फाल्कोनरला झेल पकडताच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. आशिया चषकात भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र विश्वचषकात त्यांनी शानदार खेळ केला.

सलग सहाव्यांदा आणि एकंदर १०व्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२ या पाच वर्षी विजेतेपद पटकावले होते. आता सहाव्या जेतेपदासह भारताने युवा विश्वचषकातील आपले वर्चस्व अबाधित राखले. वैभवलाच सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचेही या यशात मोलाचे योगदान आहे.

१९८८पासून सुरू झालेल्या विश्वचषकाचे हे १६वे पर्व सुरू होते. भारतानेच सर्वाधिक ५ वेळा (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२) या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर चार वेळा त्यांना (२००६, २०१६, २०२०, २०२४) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

२०२२मध्ये भारताने अखेरचा युवा विश्वचषक उंचावला, तेव्हा इंग्लंडलाच अंतिम फेरीत नमवले होते. तर २०२४च्या युवा विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. एकूण १६ संघांचा स्पर्धेत समावेश होता. मुंबईचा १८ वर्षीय आयुष या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. भारताने साखळी फेरीत सलग तिन्ही लढती जिंकताना अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांना धूळ चारली. मग सुपर-सिक्स फेरीत भारताने झिम्बाब्वे व पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. दुसरीकडे इंग्लंडने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मात्र त्यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

देशभरातून कौतुक

भारतीय युवा संघाच्या विश्वविजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अभिनंदन केले. “भारतीय क्रिकेटचे कौशल्य पुन्हा चमकले. १९ वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. या विजयामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळेल. भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा,” असे ट्वीट मोदी यांनी केले. त्याशिवाय राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनीही संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला. “संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून भारताने मिळवलेले यश संस्मरणीय आहे. भारतीय युवा संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असे मुर्मू म्हणाल्या.

‘बीसीसीआय’कडून बक्षिसाची अपेक्षा

आयसीसीकडून १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाला रोख पारितोषिक दिले जात नाही. कारण या स्पर्धेचा हेतू हा युवा खेळाडूंना संधी देण्यासह त्यांच्या कारकीर्दीला एक दिशा दाखवण्याचा असतो. मात्र, विजेत्या संघांना त्यांच्या क्रिकेट नियामक मंडळांकडून बक्षीसे दिली जातात. २०२५ मध्ये भारताच्या मुलींनी १९ वर्षांखालील विश्वचषक उंचावला, तेव्हा ‘बीसीसीआय’ने एकूण ५ कोटींचे पारितोषिक जाहीर केले होते. तूर्तास रात्री उशिरापर्यंत यंदाच्या युवा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बक्षीस जाहीर करण्यात आले नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in