

नवी दिल्ली : मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. त्यांनी ब-गटातील पहिल्या लढतीत अमेरिकावर ६ गडी व ११८ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. पाच बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज हेनिल पटेल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे गुरुवार, १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार झाला. आयपीएलमध्ये चेन्नईकडून छाप पाडल्यानंतर आयुष आता भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीसुद्धा भारतीय संघाचा सदस्य आहे. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांना अनुक्रमे अमेरिका, न्यूझीलंड, बांगलादेश यांच्याशी दोन हात करायचे आहेत.
एकूम १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी प्रत्येकी गटातील आघाडीचे तीन संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-सिक्समध्ये मग सहा-सहा संघांचे दोन गट बनवण्यात येतील. येथे प्रत्येक संघ आपल्या आधीच्या गटातील संघांविरुद्ध न खेळता अन्य गटातून आलेल्या तीन संघांशी खेळणार आहे.
सुपर-सिक्स फेरीतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ६ तारखेला अंतिम सामना रंगेल. यंदा या विश्वचषकाचे हे १६वे पर्व आहे. भारताने सर्वाधिक ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. २०२४मध्ये मात्र भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने अमेरिकेला ३५.२ षटकांत १०७ धावांत गुंडाळले. नितीश सुदीनीने ३६ धावांची एकाकी झुंज दिली. हेनिलने शानदार गोलंदाजी करताना १६ धावांत पाच फलंदाजांना माघारी पाठवले. त्याला अंब्रिश, दीपेश, वैभव यांनी एक बळी घेत सुरेख साथ दिली. पावसामुळे भारतापुढे ३७ षटकांत ९६ धावांचे सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आले होते.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. कर्णधार आयुष (१९), वैभव (२) व वेदांत त्रिवेदी (२) स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय संघ एकवेळ ३ बाद २५ अशा स्थितीत होता. मात्र विहान मल्होत्रा (१८) व अभिग्यान कुंडू (नाबाद ४२) यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. विहान बाद झाल्यावर मग मुंबईकर अभिग्यानने कनिष्क चौहानच्या (नाबाद १०) साथीने १७.२ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आता शनिवारी भारताची दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशशी गाठ पडेल, तर २४ तारखेला ते न्यूझीलंडविरुद्ध अखेरची लढत खेळतील. भारताला आशिया चषकात पराभव पत्करावा लागला असला, तरी विश्वचषकात जेतेपदाची अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : १७.२ षटकांत ४ बाद ९९ (अभिग्यान कुंडू नाबाद ४२, आयुष म्हात्रे १९; ऋत्विक अप्पिडी २/२४)
अमेरिका : ३५.२ षटकांत सर्व बाद १०७ (नितीश सुदिनी ३६, अर्जुन महेश १६; हेनिल पटेल १६/५ पराभूत वि.
सामनावीर : हेनिल पटेल