IND vs AFG 1st ODI : अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना; रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.
IND vs AFG 1st ODI : अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना; रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष
IND vs AFG 1st ODI : अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना; रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष
Published on

धरमशाला : शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या लढतीत ३९ वर्षीय अनुभवी फलंदाज रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

आयपीएलचा १९वा हंगाम नुकताच संपन्न झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद काबिज केले. त्यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता, तर भारताचा अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता.

अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ केला. आता उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून १३ जून रोजी धरमशाला येथे पहिला, तर १७ व २० जून रोजी अनुक्रमे लखनऊ व चेन्नई येथे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना होईल.

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात एक डाव आणि ३०० धावांच्या फरकाने धूळ चारली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत गिलच्या नेतृत्वात खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. मात्र या मालिकेपूर्वीच तारांकित विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. हार्दिक पंड्याही पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेस मुकणार आहे. तसेच रोहितच्या समावेशाविषयी तंदुरुस्ती चाचणीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. अखेरीस रोहितला या मालिकेसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. आगामी २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in