

मुल्लानपूर : दोन महिन्यांहून अधिक काळ आयपीएलच्या मनोरंजनात न्हाहून निघाल्यानंतर आता चाहत्यांसह भारतीय क्रिकेट संघ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघ शनिवारपासून मुल्लानपूर येथे अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. ही लढत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) भाग नसली, तरी नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंची नक्कीच कसोटी लागेल.
आयपीएलचा १९वा हंगाम नुकताच संपन्न झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद काबिज केले. त्यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. तर भारताचा अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ करणार आहे. ६ जूनपासून भारत-अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कसोटी सामना सुरू होईल. त्यानंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून १३ जून रोजी धरमशाला येथे पहिला, तर १७ व २० जून रोजी अनुक्रमे लखनऊ व चेन्नई येथे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना होईल.
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांसारखे अनुभवी खेळाडू आता भारताच्या कसोटी संघाचा भाग नाहीत. तसेच जसप्रीत बुमरा व रवींद्र जडेजा यांनादेखील या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत गिल, के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल यांच्यावर भारताची फलंदाजी अवलंबून असेल. तिसऱ्या क्रमांकावर डावखुऱ्या साई सुदर्शनला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे देवदत्त पडिक्कलला प्रतीक्षा करावी लागू शकतो. त्यानंतर पाचव्या व सहाव्या स्थानी अनुक्रमे ऋषभ पंत व ध्रुव जुरेल फलंदाजीला येतील, असे अपेक्षित आहे.
वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव हे दोन फिरकीपटू संघात असतील, हे निश्चित आहे. मात्र तिसऱ्या फिरकीपटूसाठी मानव सुतार किंवा हर्ष दुबेपैकी कुणाला पसंती मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. बुमराच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज लागल्यास नितीश रेड्डी किंवा गुर्नूर ब्रारचा पर्याय भारतापुढे उपलब्ध आहे.
दुसरीकडे हश्मतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघ एकंदर १३वा कसोटी सामना खेळणार आहे. तसेच २०१८नंतर प्रथमच अफगाणिस्तान भारताविरुद्ध कसोटी सामना खेळेल. डावखुरा फिरकीपटू खरोटे पदार्पण करण्याची शक्यता आहे. फलंदाजीत रहमत शाह, शाहिदी, अझमतुल्ला ओमरझाई व गुरबाझ यांच्यावर अफगाणिस्तानची भिस्त असेल. गोलंदाजीत त्यांना कैस अहमद, रहमान यांच्याकडून अपेक्षा असतील. अफगाणिस्तान संघ भारताला कितपत आव्हान देणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
सुदर्शनला दीर्घकाळ तिसऱ्या क्रमांकासाठी प्राधान्य : गंभीर
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने शुक्रवारी स्पष्ट केले की, युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याला कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची आणखी पुरेशी संधी दिली जाईल. सुदर्शनने आतापर्यंत खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांतील सुमार कामगिरीवरून त्याच्या क्षमतेचा अंतिम निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे गंभीर यांनी नमूद केले.
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या कसोटीतील निवृत्तीनंतर भारतीय संघाला सक्षम फलंदाजाची गरज आहे. गेल्या काही काळात भारताने तिसऱ्या स्थानी सुदर्शनसह करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल यांना पडताळून पाहिले. सुदर्शनने ६ कसोटी सामन्यांमध्ये २७.४५ च्या सुमार सरासरीने अवघ्या ३०२ धावा केल्या आहेत. तरीही त्याचा प्रतिस्पर्धी देवदत्त पडिक्कल याच्या तुलनेत सुदर्शनलाच प्राधान्य दिले जाईल. पडिक्कल २०२४ मधील पर्थ येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यापासून संघात स्थान मिळण्याची वाट पाहत आहे. सुदर्शनने आपल्या ६ कसोटींपैकी ३ सामने इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टीवर खेळले असल्याने, त्याला वगळून पडिक्कलला संघात घेणे तामिळनाडूच्या या फलंदाजावर अन्याय करणारे ठरेल, असे गंभीरचे मत आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाला की, “सुदर्शनला अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही. त्याने केवळ काही मोजकेच कसोटी सामने खेळले असून त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडमधून केली, जी सोपी जागा नाही. त्याने आयपीएलमध्ये ७२२ धावा करून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही त्याला आणखी पुरेशी संधी देणार असून यावर आता कोणतीही चर्चा करण्याची गरज नाही.” या निर्णयामुळे पडिक्कलला अद्याप वाट पाहावी लागणार असून सुदर्शन पुढील १० कसोटी सामने खेळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारत-अफगाणिस्तान यांच्यात २०१८मध्ये पहिला व एकमेव कसोटी सामना झाला होता. त्यावेळी भारताने अफगाणिस्तानला दोन दिवसांत धूळ चारली होती. त्यानंतर आता ८ वर्षांनी उभय संघ आमनेसामने येणार आहेत.
हे माहीत आहे का?
मुल्लानपूर येथे प्रथमच कसोटी सामना होणार आहे. कसोटी सामन्याचे आयोजन करणारे मुल्लानपूर हे भारतातील ३१वे ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक असेल.
खेळपट्टीचा आणि वातावरणाचा अंदाज
काही दिवसांपूर्वीच आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी मुल्लानपूरची खेळपट्टी नंदनवन मानली जात होती. मात्र कसोटीसाठी काळ्या मातीची खेळपट्टी वापरण्यात येणार असून यावर साहजिकच फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील.
पहिले दोन दिवस फलंदाजीसाठी पोषक असतील. येथे तापमान जवळपास ४० डिग्रीच्या जवळपास असेल. त्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागू शकतो. लढतीवर पावसाचे सावट नसेल. त्यामुळे पाचव्या दिवसापर्यंत लढत लांबण्याची शक्यता कमी आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्ष दुबे, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुर्नूर ब्रार, नितीश रेड्डी, देवदत्त पडिक्कल, मानव सुतार.
अफगाणिस्तान : हश्मतुल्ला शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, अफसर झझई, अझमतुल्ला ओमरझाई, बिलाल सामी, इक्रम अलिखिल, मोहम्मद सलीम, नांगेयालिया खरोटे, कैस अहमद, रहमनुल्ला खान, रहमनुल्ला गुरबाझ, रहमत शाह, सेदिउल्ला अटल, शरफुद्दीन अश्रफ, झियाउर रहमान.
वेळ : सकाळी ९.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप