मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा

वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ मिशन ऑस्ट्रेलियासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व खेळाडूंनी पर्थच्या मैदानात कसून सराव केला.
मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा
Published on

पर्थ : वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ मिशन ऑस्ट्रेलियासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून गुरुवारी सर्व खेळाडूंनी पर्थच्या मैदानात कसून सराव केला. तसेच सरावानंतर माजी कर्णधार रोहित प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करताना आढळला.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर उभय संघांत ५ टी-२० सामनेही खेळवण्यात येणार आहेत. यांपैकी एकदिवसीय मालिकेतील सर्व खेळाडू बुधवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले, तर गुरुवारपासून त्यांनी सरावाला प्रारंभ केला. रोहित-विराट यांनी एकत्रितपणे ४० ते ४५ मिनिटे फलंदाजी केली. तसेच गंभीर रोहितला काही सांगतानाही आढळला. यावेळी रोहित मात्र संयमीपणे सर्व काही ऐकत होता.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या मालिकेसाठी ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. रोहित व विराट मार्च २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचा सामना खेळले आहेत. त्यानंतर मे महिन्यात दोघांनीही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली, तर दोघेही गतवर्षी टी-२० प्रकारांतूनही निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर या दोघांच्या कामगिरीकडेच सर्वाधिक लक्ष असेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत दोन्ही खेळाडू आपले स्थान टिकवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

रोहितच्या नेतृत्वात भारताने मार्च महिन्यात दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिळवले. त्या लढतीत रोहितने ७६ धावांची खेळी साकारून संघाला विजय मिळवून देतानाच सामनावीर पुरस्कारही पटकावला. त्यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका रद्द झाली. त्यामुळे आता थेट १९ ऑक्टोबरला भारतीय संघ सात महिन्यांनी एखादी एकदिवसीय लढत खेळणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार या संघात फक्त खेळाडू म्हणून असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने फक्त एक सामना गमावला आहे.

रोहित व विराट यांनी गतवर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मग आयपीएल दरम्यान त्यांनी कसोटी प्रकारातूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा भारताकडून खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अद्याप २ वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत रोहित ४०, तर विराट ३८ वर्षांचा असेल. त्यामुळे विराटच्या तुलनेत रोहित त्या विश्वचषकापर्यंत संघात स्थान टिकवणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर नुकताच गिलच्या नेतृत्वात भारताने विंडीजला कसोटी मालिकेत २-० अशी धूळ चारली. भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने पराभूत केले, तर दुसऱ्या कसोटीत ७ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेतील गिल, के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, नितीश रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचादेखील भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या तंदुरुस्तीचाही कस लागेल.

logo
marathi.freepressjournal.in