सिडनी : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघापुढे शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवासह व्हाइटवॉश टाळण्याचे आव्हान असेल. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने भारताला कधीच एखाद्या मालिकेतील सर्व सामन्यांत नमवलेले नाही. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक विजय खुणावत आहे, तर भारत प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या विराट कोहलीच्या कामगिरीकडे या लढतीत लक्ष असेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या रविवारपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. या मालिकेत कांगारूंनी भारतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पावसामुळे पहिली लढत प्रत्येकी २६ षटकांची खेळवण्यात आली. भारताला १३६ धावांत रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांतच हे लक्ष्य गाठून सात गडी राखून दमदार विजय नोंदवला. मग दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेले २६५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४६.२ षटकांत गाठून मालिकेवर कब्जा केला. त्यामुळे आता सिडनी येथे शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार की निर्भेळ यश मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावणार, हे पाहणे रंजक ठरेल.
रोहित शर्मा आणि विराट हे दोन्ही तारांकित खेळाडू या मालिकेद्वारे तब्बल सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. त्यामुळे या दोघांच्याच कामगिरीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचे खेळले होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर मे महिन्यात प्रथम रोहितने, मग विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यातच आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या हेतूने आता ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय गिलकडे सोपवण्यात आले आहे. मात्र गिलच्या नेतृत्वात रोहितच्या तुलनेत विराट अधिक अपयशी ठरत आहे.
३६ वर्षीय विराट पहिल्या सामन्यात ८, तर दुसऱ्या लढतीत ४ चेंडू खेळला. दोन्ही वेळेस त्याला भोपळा फोडता आला नाही. १७ वर्षांच्या एकदिवसीय कारकीर्दीत विराट प्रथमच सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला. ऑफस्टम्प बाहेरील चेंडूंवर विराट चाचपडत असून पायचीत होतानाही त्याचे शरीर अधिक वाकत असल्याचे दिसून आले. विराटची देहबोलीसुद्धा क्षेत्ररक्षणाच्या वेळेस खालावलेली जाणवत आहे. ॲडलेड येथील सामन्यात बाद झाल्यावर माघारी परतताना त्याने चाहत्यांना हात उंचावून केलेला गुडबाय सध्या चर्चेचा विषय आहे. भारताचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा थेट २०२७-२८मध्ये आहे. त्यामुळे तोपर्यंत विराट एकदिवसीय संघाचा भाग असेल की नाही, याविषयी साशंका आहे. अशा स्थितीत शनिवारी सिडनीतील तिसरा सामना विराटचा ऑस्ट्रेलियन भूमीवर अखेरचा ठरू शकतो.
दुसरीकडे, पहिल्या लढतीत ८ धावांवर बाद होणाऱ्या रोहितने दुसऱ्या सामन्यात ९७ चेंडूंत ७३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. मात्र तोसुद्धा सुरुवातीच्या ३०-४० चेंडूंत चाचपडताना दिसला. यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा असे खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत असल्याने आता प्रत्येक लढतीद्वारे रोहित आणि विराटवरील दडपण वाढणार, हे पक्के. त्यातच प्रशिक्षक गौतम गंभीर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी काही ठोस निर्णय घेणार का, याकडेही लक्ष असेल.
दरम्यान, मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने नव्या फलंदाजांसह छाप पाडली आहे. मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली, मॅट रेनशॉ यांनी जबाबदारी यशस्वीपणे बजावली आहे. तसेच गोलंदाजीत जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क नेहमीप्रमाणे आग ओकणारा मारा करत आहेत. फिरकीपटू ॲडम झाम्पा त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहे. त्यामुळे तिसऱ्या लढतीतही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड मानले जात असून गिलच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा कस लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध आजवर एकदाही व्हाइटवॉश मिळवलेला नाही. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक संधी आहे.
विराट एकदिवसीय कारकीर्दीत प्रथमच सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. शनिवारी पुन्हा एकदा असेच घडले, तर त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला जाईल.