कोण होणार चॅम्पियन? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज युवा विश्वचषकासाठी झुंज

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने २००८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर या स्पर्धेची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
कोण होणार चॅम्पियन? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज युवा विश्वचषकासाठी झुंज
Published on

बेनोनी (दक्षिण आफ्रिका) : कारकीर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आता काहींच्या करिअरला बूस्टर डोस मिळणार असून काहींच्या कारकीर्दीला उतरती कळा लागेल. मात्र सहाव्यांदा युवा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, हे नक्कीच. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.

गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप उंचावण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले होते. मात्र देशाचे युवा क्रिकेटपटू मात्र ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत तिसऱ्यांदा मात देऊन त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान, सौम्यकुमार पांडे यांच्या कामगिरीकडे पुन्हा एकदा देशवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियाला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत २०१२ आणि २०१८ साली अंतिम फेरीत धुळ चारली आहे. वयोगटाच्या स्पर्धांमध्ये भारत नेहमीच वरचढ ठरत असून २०१६ पासून भारताने सर्व स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. त्यापैकी २०१८ आणि २०२२मध्ये भारताने युवा विश्वचषक पटकावला असून २०१६ आणि २०२०मध्ये युवा संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने २००८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर या स्पर्धेची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ यांसारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारताला युवा विश्वचषक स्पर्धेमार्फतच मिळाले आहेत.

मात्र युवा विश्वचषक स्पर्धेत चमकलेले खेळाडू नंतर वरिष्ठ स्तरावर अपयशी ठरल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यात रितिंदर सिंग सोधी, गौरव धिमान्स हे २०००च्या काळातील तर अलीकडचे उन्मुक्त चंद, हरमीत सिंग, विजय झोल, संदीप शर्मा, अजितेश अरगल, कमल पास्सी, सिद्धार्थ कौल, स्मित पटेल, रवीकांत सिंग आणि कमलेश नागरकोटी ही काही नावे सांगता येतील. पृथ्वी शॉची कारकीर्द ऐन जोमात असताना, दुखापती आणि त्याच्या वाईट सवयींमुळे कारकीर्दीला उतरती कळा लागली. यश धुल हासुद्धा वरिष्ठ स्तरावर आपला दर्जा उमटवू शकला नाही.

यंदा उदय सहारन याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला अंतिम फेरीचा दावेदार मानले जात नव्हते. कारण काही महिन्यांपूर्वी १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात सहारनचाच भारतीय संघ अपयशी ठरला होता. मात्र यावेळी सर्व अडथळ्यांवर मात करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सहारनने या स्पर्धेत सर्वाधिक ३८९ धावा फटकावल्या असून त्याची कामगिरी प्रत्येक सामन्यागणिक उंचावत आहे. त्याच्या दमदार फलंदाजीमुळेच भारताला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवता आला. महाराष्ट्राचा युवा फलंदाज सचिन धस यानेही फिनिशर म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. डावखुरा फिरकीपटू सौमी पांडे याने आतापर्यंत १७ विकेट्स मिळवत आपली छाप पाडली आहे.

सचिन धस याला वरिष्ठ स्तरावर एकही सामना न खेळल्यामुळे आयपीएलच्या करारात भाग घेता आला नाही. मात्र वरिष्ठ स्तरावर कसे खेळायचे, याचे टेम्परामेंट त्याच्याकडे नक्कीच आहे. सर्फराझ खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याने दोन शतके झळकावली असून फिरकी गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज राज लिम्बानी तसेच डावखुरा मध्यमगती गोलंदाज नमन तिवारी हे प्रभावी ठरत असून रविवारी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करू -सहारन

वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर आता आम्ही कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कठोर परिश्रम, एकता आणि खेळाप्रतीचे प्रेम यामुळेच आम्हाला चांगली कामगिरी करता आली. अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची परंपरा कायम ठेवून आम्ही नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करू. हा फक्त अंतिम सामना नाही तर आमची नावे इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरण्याची एक नामी संधी असेल, असे भारताचा कर्णधार उदय सहारन याने सांगितले.

भारताने याआधी पाच वेळा युवा विश्वचषकावर नाव कोरले असून सहाव्यांदा वर्ल्डकप पटकावण्यासाठी भारताचा युवा संघ उत्सुक आहे. भारताने याआधी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२मध्ये जेतेपद पटकावले आहे.

भारताने तब्बल ९ वेळा युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. याआधी २०००, २००६, २००८, २०१२, २०१६, २०१८, २०२० आणि २०२२मध्ये भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारत : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अविनाश राव, सौमी कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनूश गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.

ऑस्ट्रेलिया : ह्यू वेबगेन (कर्णधार), लचलन ऐतकेन, चार्ली अँडरसन, हरकीरत बाजवा, माहली बीअर्डमॅन, टॉम कॅम्प्बेल, हॅरी डिक्सॉन, रायन हिक्स, सॅम कोनस्टास, राफेल मॅकमिलन, आयडन ओकॉनर, हरजस सिंग, टॉम स्ट्रॉकर, कॅलम विडलर, ऑली पीक.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन वेळा युवा विश्वचषकाची अंतिम फेरी रंगली असून भारताने २०१२ आणि २०१८मध्ये कांगारूंना धूळ चारली आहे.

वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

logo
marathi.freepressjournal.in