

नवी मुंबई : महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामना रंगणार आहे. विश्वचषकाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारताच्या रणरागिणींना या लढतीत आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. त्यामुळेच आज चुकीला माफी नाही, अशी स्थिती उद्भवली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गतविजेत्यांशी दोन हात करणार आहे. या लढतीवर पावसाचेही काहीसे सावट असेल.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगत असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत झाल्या. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले असून भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती. यावेळी मात्र भारतीय संघ जेतेपद पटकावण्यासाठी आतुर आहे.
भारताने या स्पर्धेत श्रीलंका व पाकिस्तान यांना नमवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन बलाढ्य संघांकडून भारताला पराभव पत्करावा लागला. त्यातही आफ्रिका व इंग्लंडविरुद्धचा पराभव अधिक जिव्हारी लागणारा ठरला, कारण एकवेळ भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. त्यामुळे चाहत्यांकडून होणारी टीका व अपेक्षांचे दडपण झेलून भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी केली व उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. भारताचा बांगलादेशविरुद्धचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला. भारताने ७ सामन्यांतील ७ गुणांसह (३ विजय, ३ पराभव, १ रद्द लढत) चौथे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली.
दुसरीकडे एलिसा हिलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे साखळी फेरीत अग्रस्थान मिळवून थाटात आगेकूच केली. त्यांनी ७ पैकी ६ लढती जिंकल्या, तर १ सामना पावसामुळे रद्द झाला. २०२२मध्ये विश्वचषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने त्यावेळी सलग ९ लढती जिंकल्या होत्या. म्हणजेच ते विश्वचषकात गेल्या १६ लढतींमध्ये अपराजित आहेत. यापूर्वी २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारतानेच ऑस्ट्रेलियाला अखेरचे नमवले होते. आता ८ वर्षांनी भारताला पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी खुणावत आहे.
दरम्यान, भारत चौथ्यांदा महिलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी १९७८, १९९७ व २०१३मध्ये भारतात महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगला होता. भारताने आजवर टी-२० किंवा एकदिवसीय प्रकारात एकदाही विश्वचषक उंचावलेला नसल्याने यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच ते ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यास आतुर असतील. २ नोव्हेंबरला नवी मुंबईतच अंतिम सामना होईल.
दरम्यान, या लढतीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल. तसेच पावसाचीही शक्यता असल्याने संघ धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देतील. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ३३१ धावांचे लक्ष्य गाठले होते.
पाऊस आला तर...
पावसामुळे गुरुवारी लढत शक्य न झाल्यास शुक्रवारी (राखीव दिवशी) होईल. तेव्हाही सामना न झाल्यास ऑस्ट्रेलिया साखळी फेरीत अग्रस्थान मिळवल्याने आगेकूच करेल.
शफालीवर अपेक्षांचे दडपण; हिलीबाबत मात्र संभ्रम
प्रतिका रावल दुखापतीमुळे विश्वचषकाच्या बाहेर गेल्याने भारताला नक्कीच धक्का बसला आहे. मात्र तिच्या जागी शफाली वर्मा सलामीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शफालीने स्वत:च पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. शफालीवर सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण करण्याची जबाबदारी असेल. स्मृती मानधना, हरमनप्रीतची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची कर्णधार हिलीसुद्धा स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नाही. तिने बुधवारी सराव केला असला, तरी भारताविरुद्ध ती खेळणार की नाही, याचा निर्णय लढतीपूर्वीच घेण्यात येईल. गार्डनर, मुनी, पेरीवर त्यांची भिस्त असेल.
उभय महिला संघांत आतापर्यंत ६० एकदिवसीय सामने झाले असून ऑस्ट्रेलियाने ४९, तर भारताने ११ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे नक्कीच जड आहे.