बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

जसप्रीत बुमराहने मँचेस्टर येथील चौथी कसोटी खेळणे गरजेचे आहे. संघ मालिकेत पिछाडीवर असताना तुमच्या प्रमुख गोलंदाजाने विश्रांती घेणे चुकीचे ठरेल. त्यामुळे बुमराहने पुरेशी विश्रांती घेत चौथी कसोटी खेळावी, असे मत भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी नोंदवले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मँचेस्टर : जसप्रीत बुमराहने मँचेस्टर येथील चौथी कसोटी खेळणे गरजेचे आहे. संघ मालिकेत पिछाडीवर असताना तुमच्या प्रमुख गोलंदाजाने विश्रांती घेणे चुकीचे ठरेल. त्यामुळे बुमराहने पुरेशी विश्रांती घेत चौथी कसोटी खेळावी, असे मत भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी नोंदवले आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रात १९२ धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात १७० धावांत गारद झाला. त्यामुळे इंग्लंडने अवघ्या २२ धावांनी सरशी साधून क्रिकेटच्या पंढरीत संस्मरणीय विजय नोंदवला. बुमराह पहिल्या व तिसऱ्या कसोटीचा भाग होता. या दोन्ही कसोटींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. आता २३ जुलैपासून मँचेस्टर येथे चौथी कसोटी सुरू होईल. त्या लढतीसाठी बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि दीपदास गुप्ता यांनी बुमराहला खेळवण्याची सूचना दिली आहे.

आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली यांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला नेस्तनाबूत करून त्यांचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. तिसऱ्या कसोटीत बुमराह संघात परतल्यानंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. पाठदुखी आणि कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) या कारणांमुळे बुमराह पाचपैकी तीनच सामने खेळेल, हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत झालेल्या पाचव्या कसोटीपासून बुमराहला या दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे बुमराह चौथी कसोटी खेळणार की थेट ३१ जुलैपासून ओव्हल येथे पाचवी कसोटी खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१-२२मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमराह भारताचा कर्णधार होता. त्यामुळे यावेळी भारताला १८ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची उत्तम संधी असून गिल आणि कंपनी यामध्ये यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे शास्त्री, गुप्ता यांचे म्हणणे?

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीच्या दरम्यान ९ दिवसांचा अवधी आहे. बुमराहला इतका वेळ विश्रांतीसाठी पुरेसा आहे. संघाला त्याची चौथ्या कसोटीत गरज आहे. त्यामुळे भारताने बुमराहला विश्रांती दिली, तर यामुळे फार चुकीचे उदाहरण समोर येईल, असे मत रवी शास्त्री यांनी नोंदवले.

तसेच दीपदास गुप्ता यांनीही बुमराह व पंतबाबत संभ्रम व्यक्त केला. पंतला यष्टिरक्षणादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत बहुतांश वेळा ध्रुव जुरेलने यष्टिरक्षण केले. तसेच बुमराह पाठदुखीमुळे चौथ्या कसोटीस मुकणार असल्याचे समजते. मात्र गुप्ता यांनी या दोघांनीही चौथी कसोटी खेळणे गरजेचे आहे, असे म्हटले. बुमराहला विश्रांती दिल्यास भारतीय संघात प्रसिध कृष्णाचे पुनरागमन होऊ शकते. पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये कृष्णाने सहापेक्षा जास्त सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा दिल्या. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवचा पर्यायही भारतापुढे आहे.

logo
marathi.freepressjournal.in