विशाखापट्टणम : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीचा जोरदार दणका बसला. त्यामुळे आता विशाखापट्टणम येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून पाच लढतींच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान रोहितच्या शिलेदारांपुढे असेल. या कसोटीत प्रामुख्याने शुभमन गिल, श्रेयस अय्यर या भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. त्याशिवाय रोहितचे नेतृत्वकौशल्यही पणाला लागेल.
कर्णधार बेन स्टोक्स व प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम यांच्या नव्या दमाच्या इंग्लंडने हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत भारतावर २८ धावांनी मात केली. मुख्य म्हणजे पहिल्या डावात भारताने १९० धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतरही इंग्लंडने ओली पोपच्या दीडशतकाच्या बळावर सरशी साधून भारताला नेस्तनाबूत केले. विराट कोहलीची अनुपस्थिती भारताला प्रकर्षाने जाणवली. विराट दुसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध आहे. त्यातच के. एल. राहुल व रवींद्र जडेजा हे दोन अनुभवी खेळाडू या कसोटीला मुकणार असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच निर्माण झाला आहे.
विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. येथे झालेल्या दोन्ही कसोटींमध्ये भारताने विजय मिळवले आहेत. तसेच २०१९मध्ये येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत रोहितने १७६ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार, हे पाहणे रंजक ठरेल. दुसरीकडे इंग्लंडने मात्र पुन्हा एकदा सामन्याच्या एक दिवस अगोदरच ११ खेळाडूंची नावे जाहीर करत आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे दुसरी कसोटी एकूणच मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
पाटिदार की सर्फराझ; पदार्पण कुणाचे?
मध्य प्रदेशचा रजत पाटिदार आणि मुंबईकर सर्फराझ खान यांच्यापैकी एकाला या कसोटीत पदार्पणाची संधी मिळेल, हे जवळपास पक्के आहे. मात्र त्यांच्यापेक्षाही मुख्य लक्ष्य हे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा गिल तसेच पाचव्या स्थानावरील मुंबईकर श्रेयस यांच्यावर असेल. गिलने गेल्या ११ कसोटींमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. विशेषत: त्याने स्वत:हूनच कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे श्रेयसही धावांसाठी झगडत आहे. अशा स्थितीत रोहित व यशस्वी जैस्वाल या मुंबईतील सलामीवीरांवरच भारताची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून असेल. विशेषत: इंग्लंडच्या फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाजांना स्वीप व रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांचा योग्य वापर करावा लागेल.