जैस्वाल एकटाच 'यशस्वी'! अन्य फलंदाजांकडून निराशा; भारताची ६ बाद ३३६ धावांपर्यंत मजल

मुंबईच्या २२ वर्षीय यशस्वी जैस्वालने शुक्रवारी कारकीर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या रचतानाच दीडशतकी खेळी साकारली.
जैस्वाल एकटाच 'यशस्वी'! अन्य फलंदाजांकडून निराशा; भारताची ६ बाद ३३६ धावांपर्यंत मजल

विशाखापट्टणम : मुंबईच्या २२ वर्षीय यशस्वी जैस्वालने शुक्रवारी कारकीर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या रचतानाच दीडशतकी खेळी साकारली. डावखुरा सलामीवीर यशस्वीने एकाकी किल्ला लढवत २५७ चेंडूंत नाबाद १७९ धावा केल्याने भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसअखेर ९३ षटकांत ६ बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वी वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला किमान अर्धशतकही झळकावता आले नाही.

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर यशस्वीसह रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे शनिवारी यशस्वी तळाच्या फलंदाजांसह द्विशतक साकारतानाच भारताला ४०० धावांपलीकडे नेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. फक्त सहावा कसोटी सामना खेळणाऱ्या यशस्वीने कारकीर्दीतील दुसरे शतक साकारताना १७ चौकार व ५ षटकार लगावले आहेत. त्याने जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच १७१ धावा फटकावल्या होत्या. इंग्लंडसाठी रेहान अहमद व पदार्पणवीर शोएब बशीरने प्रत्येकी दोन, तर जेम्स अँडरसन व टॉम हार्टली यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी स्वीकारली. या कसोटीसाठी भारताने रजत पाटिदारला पदार्पणाची संधी दिली. तसेच मोहम्मद सिराजला विश्रांती देत मुकेश कुमारचा संघात समावेश केला, तर रवींद्र जडेजाच्या चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव संघात परतला. पाच कसोटींच्या या मालिकेत बेन स्टोक्सच्या इंग्लंडचा संघ १-० असा आघाडीवर आहे.

यशस्वी व रोहित यांनी सावध सुरुवात केली. १७ षटकांत ४० धावा झालेल्या असताना बशीरने रोहितला (१४) बाद करून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला बळी पटकावला. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शुभमन गिलने उत्तम प्रारंभ केला. मात्र ५ चौकारांसह ३४ धावा झालेल्या असताना जेम्स अँडरसनने ऑफ-स्टम्पबाहेर टाकलेल्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न त्याला महागात पडला. यशस्वीने मात्र सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतकाचा टप्पा ओलांडला. यशस्वी व श्रेयस अय्यर या मुंबईकरांनी अधिक पडझड होऊ न देता उपाहारापर्यंत भारताला २ बाद १०३ धावांपर्यंत नेले.

दुसऱ्या सत्रात यशस्वीने अधिक मुक्तपणे फलंदाजी केली. ४९व्या षटकात हार्टलीला षटकार लगावून त्याने १५१ चेंडूंत थाटात शतक झळकावले. श्रेयससह यशस्वीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. २७ धावांवर श्रेयस हार्टलीच्या गोलंदाजीवर फसला. मग पदार्पण करणाऱ्या पाटिदासोबतही यशस्वीची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भर घातली. मात्र पाटिदारही (३२) चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलू शकला नाही व रेहानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

तिसऱ्या सत्रात मग यशस्वीने अक्षर पटेल व के. एस. भरत यांच्यासह उपयुक्त भागीदाऱ्या रचल्या. अक्षर-यशस्वीने पाचव्या विकेटसाठी ५२, तर भरत-यशस्वीने सहाव्या विकेटसाठी २९ धावांची भर घातली. अक्षरला २७ धावांवर बशीरने, तर भरतला १७ धावांवर रेहानने बाद केले. यशस्वीने मात्र दुसऱ्या बाजूने जो रूटला चौकार लगावून दीडशतकाची वेस ओलांडताना भारताला ३०० धावांपलीकडे नेले. भारताने पहिल्या सत्रात १०३, दुसऱ्या सत्रात १२२, तर तिसऱ्या सत्रात १११ धावा केल्या. यशस्वी सहा तासांहून अधिक काळ खेळपट्टीवर ठाण मांडून असून शनिवारी त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

यशस्वी गाथा

-भारतीय फलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्याच दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत यशस्वीने (नाबाद १७९) अग्रस्थान मिळवले. त्याने बुधी कुंडेरान यांचा १९६४मधील नाबाद १७० धावांचा विक्रम मोडीत काढला.

-वयाची २३ वर्षे होण्यापूर्वीच मायदेशात तसेच विदेशात कसोटी शतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांनी अशी कामगिरी केली होती. मुख्य म्हणजे हे चारही खेळाडू मुंबईचे आहेत.

-कारकीर्दीतील पहिल्या दोन शतकांचे दीडशतकात रूपांतर करणारा यशस्वी हा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी विनोद कांबळी, व्हीव्हीएस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा यांनी हा पराक्रम केला होता.

-भारतीय फलंदाजातर्फे कसोटीच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत यशस्वीने पाचवे स्थान मिळवले. यामध्ये वीरेंद्र सेहवाग (२२८ वि. पाकिस्तान), वासिम जाफर (१९२ वि. पाकिस्तान), शिखर धवन (१९० वि. श्रीलंका), सेहवाग (१८० वि. वेस्ट इंडिज) यांचा समावेश आहे.

इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा वयाच्या ४१व्या वर्षी भारतात कसोटी सामना खेळणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसनने भारताच्या लाला अमरनाथ यांचा विक्रम मोडीत काढला. अमरनाथ यांचे १९५२मध्ये वय ४१ वर्षे, ९२ दिवस होते. तर अँडरसनचे सध्याचे वय ४१ वर्षे, १८७ दिवस आहे. अँडरसनला कसोटीतील ७०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी ९ बळींची आवश्यकता आहे.

निकालाचा फारसा विचार न करता माझे लक्ष हे चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्यावर असते. जेव्हा इंग्लंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. तेव्हा मी त्यांना सन्मान देतो. खराब चेंडूंचा मी खरपूस समाचार घेतो. अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहून मला भारताला मोठी धावसंख्या उभारून द्यायची आहे.

- यशस्वी जैस्वाल

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९३ षटकांत ६ बाद ३३६ (यशस्वी जैस्वाल नाबाद १७९, शुभमन गिल ३४, रजत पाटिदार ३२; रेहन अहमद २/६१)

logo
marathi.freepressjournal.in