थंड वातावरणात कुलदीप तळपला! फिरकीपुढे इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांतच संपुष्टात

नयनरम्य उंच पर्वतांची रांग आणि थंडगार वातावरणात भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (७२ धावांत ५ बळी) तेजाने तळपला.
थंड वातावरणात कुलदीप तळपला! फिरकीपुढे इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांतच संपुष्टात

धरमशाला : नयनरम्य उंच पर्वतांची रांग आणि थंडगार वातावरणात भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (७२ धावांत ५ बळी) तेजाने तळपला. त्याला शतकवीर रविचंद्रन अश्विनच्या (५१ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव ५७.४ षटकांतच २१८ धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (८३ चेंडूंत नाबाद ५२ धावा) आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल (५८ चेंडूंत ५७ धावा) या मुंबईकरांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे भारताने पहिल्या दिवसअखेर १ बाद १३५ धावांपर्यंत मजल मारून दमदार सुरुवात केली.

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतीय संघ ८३ धावांनी पिछाडीवर असून रोहितच्या साथीला शुभमन गिल ३९ चेंडूंत २६ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भर घातली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पूर्ण दिवस फलंदाजी करून इंग्लंडवर मोठी आघाडी मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल. पहिल्या दिवसाचा खरा तारा मात्र २९ वर्षीय कुलदीप ठरला. २०१७मध्ये याच मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीपने पदार्पण केले होते.

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या मालिकेत ३-१ असा विजयी आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी झटत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराचे या कसोटीसाठी पुनरागमन झाल्याने आकाश दीपला नाइलाजास्तव संघाबाहेर बसावे लागले, तर रजत पाटिदार जायबंदी झाल्याने देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी देण्यात आली.

बुमरा आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान जोडीसमोर इंग्लंडचे सलामीवीर सुरुवातीला चाचपडले. मात्र त्यांनी बळी गमावला नाही. झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी मालिकेत पाचव्यांदा अर्धशतकी सलामी नोंदवताना १७ षटकांत ६४ धावा केल्या. अखेर १८व्या षटकात रोहितने कुलदीपकडे चेंडू सोपवला व त्याने वैयक्तिक पहिल्याच षटकात डकेटचा (२७) अडसर दूर केला. गिलने मागे धावत जाऊन डकेटचा अप्रतिम झेल टिपला. क्रॉलीने मात्र कारकीर्दीतील १४वे, तर मालिकेतील चौथे अर्धशतक साकारले. उपहारापूर्वी अखेरच्या षटकात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नात ओली पोप (११) फसला आणि कुलदीपच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला.

२ बाद १०० धावांवरून दुसऱ्या सत्राला सुरुवात करताना क्रॉली आणि जो रूट यांनी सावध खेळ केला. मात्र कुलदीपने पुन्हा एकदा अफलातून चेंडू टाकून क्रॉलीचा त्रिफळा उडवला. क्रॉलीने १०८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ७९ धावा केल्या. त्यानंतर कारकीर्दीतील १००वी कसोटी खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोने १८ चेंडूंत प्रत्येकी २ चौकार-षटकारांसह २९ धावा फटकावून कुलदीपवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीपने त्यालाही बाद करून इंग्लंडची स्थिती ४ बाद १७५ अशी केली. कुलदीपचा हा कसोटी कारकीर्दीतील ५०वा बळी ठरला. तेथून मग पाहुण्यांची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली.

रवींद्र जडेजाने पुढच्याच षटकात रूटला (२६) पायचीत पकडले. तर कुलदीपने स्टोक्सला (०) भोपळाही फोडू न देता बळींचे पंचक पूर्ण केले. मग अश्विनने टॉम हार्टली (६) आणि मार्क वूड (०) यांना एकाच षटकात बाद करून इंग्लंडची चहापानाला ८ बाद १९४ अशी अवस्था केली. तिसऱ्या सत्रात बेन फोक्स (२४) आणि शोएब बशीर (नाबाद ११) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र अश्विनने प्रथम फोक्सला, तर तीन चेंडूंच्या अंतरात जेम्स अँडरसनला (०) बाद करून इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांत गुंडाळला. इंग्लंडने अखेरचे ७ बळी ४३ धावांतच गमावले. भारताकडून कुलदीपने पाच, अश्विनने चार, तर जडेजाने एक बळी मिळवला.

त्यानंतर यशस्वी जैस्वाल व रोहित या सलामीवीरांनी भारतासाठी धडाकेबाज सुरुवात करताना २१ षटकांतच १०४ धावांची भागीदारी रचली. २२ वर्षीय यशस्वीने मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावताना ५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो ५८ चेंडूंत ५७ धावा फटकावून यष्टिचीत झाला. रोहितने दुसऱ्या बाजूने ६ चौकार व २ षटकारांसह कारकीर्दीतील १८वे, तर मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याला गिलने प्रत्येकी २ चौकार-षटकार लगावून सुरेख साथ दिली असल्याने भारताने पहिल्या दिवसाचा शेवटही उत्तम केला.

संक्षिप्त धावफलक

- इंग्लंड (पहिला डाव) : ५७.४ षटकांत सर्व बाद २१८ (झॅक क्रॉली ७९, जॉनी बेअरस्टो २९; कुलदीप यादव ५/७२, रविचंद्रन अश्विन ४/५१)

- भारत (पहिला डाव) : ३० षटकांत १ बाद १३५ (यशस्वी जैस्वाल ५७, रोहित शर्मा नाबाद ५२, शुभमन गिल नाबाद २६; शोएब बशीर १/६४)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in