

चेस्टर ली स्ट्रीट : आयर्लंड संघाविरुद्ध नुकताच विश्वविजेत्या भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली. यातून सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नसतानाच आता बुधवारपासून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवार, १ जुलैपासून प्रारंभ होणार असून या निमित्ताने कर्णधार श्रेयस अय्यर व प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पुन्हा कस लागणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र आता सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस आता कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज असून श्रेयस व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी किती यश मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. २०२४मध्ये याच कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीने कोलकाताला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी लाभली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध तो पदार्पण करेल, असे अपेक्षित आहे.
आयपीएलमधील चमकदार कामगिरी आणि त्यानंतर श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत भारत-अ संघाकडून खेळताना वैभवने २९ चेंडूत ९४ धावांची धडाकेबाज खेळी केल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या भारतीय संघाचे सलामीवीर म्हणून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे तिघे मुख्य दावेदार आहेत. टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघात या तिघांनीही चमक दाखवली होती. मात्र आयर्लंडविरुद्ध आघाडीची फळी अपयशी ठरली होती.
वेळ : रात्री १० वाजता; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी