

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा निर्णायक तिसरा सामना रविवारी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माच्या कामगिरीवर संपूर्ण जगाची नजर असेल. रोहितच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, हा सामना रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना नसेल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे. मात्र, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ३९ वर्षीय माजी कर्णधाराला या सामन्यात स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
पेसर्सविरुद्ध फ्रंट फूटवर पूल शॉट्स मारणे आणि फिरकीपटूंना सहज खेळून काढणे ही रोहितची ओळख आहे, परंतु या मालिकेत त्याला अद्याप सूर गवसलेला नाही.
त्यामुळे २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात तो खेळणार का, याबाबत क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कार्डिफ येथील खेळपट्टीवर त्याला सलग ९ चेंडू खेळूनही धाव घेता आली नव्हती आणि तो बाद झाला होता. आता क्रिकेटचे पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरील फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर रोहितला आपला फॉर्म परत मिळवण्याची संधी असेल.
कर्णधार म्हणून पॉवरप्लेमध्ये जोखीम पत्करून आक्रमक खेळण्याची भूमिका रोहितने पार पाडली आहे. रविवारी देखील चाहत्यांना त्याचा असाच खेळ पाहण्याची अपेक्षा असेल. पहिल्या १० षटकांमध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा सामना करणे हे रोहितसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. दुसरीकडे, सध्याचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्यामुळे भारताकडे लक्ष असेल.
वेळ दुपारी : ३.३० वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३