
नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारतीय संघाने गुरुवारी सांघिक कामगिरीचा उत्तम नजराणा सादर केला. गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीवर फलंदाजांनी तिहेरी अर्धशतकांचा कळस चढविला. त्यामुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ४ गडी आणि ६८ चेंडू राखून धूळ चारली. उपकर्णधार शुभमन गिल (९६ चेंडूंत ८७ धावा) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
ऑगस्ट महिन्यानंतर प्रथमच एकदिवसीय लढत खेळत असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडने दिलेले २४९ धावांचे लक्ष्य ३८.४ षटकांत गाठले. गिलव्यतिरिक्त मुंबईकर श्रेयस अय्यर (३६ चेंडूंत ५९), डावखुरा अक्षर पटेल (४७ चेंडूंत ५२), पदार्पणवीर हर्षित राणा (५३ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू रवींद्र जडेजा (२६ धावांत ३ बळी) या चौकडीने भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना रविवारी कटक येथे खेळविण्यात येईल.
प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारताने नुकताच टी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ अशी धूळ चारली. मात्र एकदिवसीय तसेच कसोटी प्रकारात प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या जोडीला अद्याप चमक दाखवता आलेली नाही. ऑगस्टमध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यामध्ये भारताच्या पदरी ०-२ अशी निराशा पडली. त्यानंतर आता सहा महिन्यांनी भारतीय संघ पुन्हा एकदिवसीय प्रकाराकडे वळला. तसेच पुढील १२ दिवसांत म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघाची पूर्वपरीक्षा म्हणून पाहिले जात आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांना येथील खेळपट्टी व वातावरणाचा योग्य अंदाज बांधता आला नाही, असे दिसते. इंग्लंडने त्यांचे अंतिम ११ खेळाडू एकदिवस आधीच जाहीर केले होते. दुसरीकडे भारताने मात्र यशस्वी जैस्वाल व हर्षित यांना एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली. तसेच विराट कोहली उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकला नाही. अर्शदीप सिंगच्या सागी मोहम्मद शमीच्या साथीने हर्षितला वेगवान गोलंदाज म्हणून प्राधान्य देण्यात आले. तसेच वरुण चक्रवर्तीऐवजी कुलदीप यादव, जडेजा व अक्षर यांचे फिरकी त्रिकुट खेळले. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतऐवजी के. एल. राहुलला संधी देण्यात आली.
इंग्लंडची सुरुवात धडाकेबाज झाली. विशेषत: फिल सॉल्टने हर्षितच्या एका षटकात २६ धावा लुटल्या. ८ षटकांत सॉल्ट व बेन डकेट यांनी ७५ धावांची सलामी नोंदवली होती. मात्र हार्दिक पंड्याच्या षटकात तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सॉल्ट फसला. श्रेयसने सीमारेषेवरून राहुलकडे सुरेख थ्रो करून सॉल्टला धावचीत केले. सॉल्टने २६ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्यानंतर हर्षितने एकाच षटकात डकेट (३२) व हॅरी ब्रूक (०) यांचा अडसर दूर करून कामगिरी उंचावली. यशस्वीने डकेटचा अप्रतिम झेल टिपला.
३ बाद ७७ वरून बटलर व १४ महिन्यांनी एकदिवसीय सामना खेळणारा जो रूट या अनुभवी जोडीने इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने रूटला १९ धावांवर पायचीत पकडले. बटलरने मग जेकब बेथलच्या साथीने संघाला १५० धावांपलीकडे नेले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. बटलरने एकदिवसीय कारकीर्दीतील २७वे, तर बेथलने दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अक्षरने ३३व्या षटकात धोकादायक बटलरचा ५२ धावांवर अडसर दूर केला. लियाम लिव्हिंगस्टोन (५) अपयशी ठरला. मग जडेजाने बेथललाही ५१ धावांवर पायचीत पकडून इंग्लंडला २५० धावांच्या आत रोखले. अखेर कुलदीपने साकिब महमूदला बाद करून ४७.४ षटकांत २४८ धावांत इंग्लंडचा संघ गुंडाळला.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व यशस्वी या मुंबईकर सलामी जोडीकडून दमदार सुरुवात अपेक्षित होती. मात्र जोफ्रा आर्चरने अप्रतिम मारा करताना यशस्वीला १५ धावांवार बाद केले. तर रोहित पुन्हा एकदा खराब फटका खेळून ७ चेंडूंत २ धावांवर बाद झाला. २ बाद १९ वरून मात्र श्रेयस व गिलच्या जोडीने आक्रमण केले. विशेषत: श्रेयसने आर्चरला लगावलेले दोन षटकार पाहण्याजोगे होते. ३० चेंडूंतच श्रेयसने २०वे अर्धशतक साकारले. श्रेयस व गिलने तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. बेथलने श्रेयसला पायचीत पकडून ही जोडी फोडली.
पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या अक्षरने मात्र धावगती कमी होऊ दिली नाही. त्यानेही ६ चौकार व १ षटकारासह तिसरे अर्धशतक साकारतानाच गिलसोबत चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या बाजूने गिलने १४ चौकारांसह १४वे एकदिवसीय अर्धशतक साकारले. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच रशिदने अक्षरचा, तर महमूदने गिलचा अडथळा दूर केला. राहुलही (२) लगेचच माघारी परतला. मात्र जडेजा (नाबाद १२) व हार्दिक (नाबाद ९) यांनी औपचारिकता पूर्ण करून ३९व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताने नागपूर येथे सलग चौथा एकदिवसीय सामना जिंकला. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन (२०१३, २०१७, २०१९), तर इंग्लंडविरुद्धच्या गुरुवारच्या लढतीचा समावेश आहे. २०११च्या विश्वचषकात भारताने नागपूर येथे लढत गमावली होती. त्यानंतर भारतीय संघ येथे अपराजित आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ४७.४ षटकांत सर्व बाद २४८ (जोस बटलर ५२, जेकब बेथल ५१; रवींद्र जडेजा ३/२६, हर्षित राणा ३/५३) पराभूत g वि. भारत : ३८.४ षटकांत ६ बाद २५१ (शुभमन गिल ८७, श्रेयस अय्यर ५९, अक्षर पटेल ५२; साकिब महमूद २/४७)
सामनावीर : शुभमन गिल