
गेल्या अनेक महिन्यांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेला भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याचा कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. इंग्लंडने दिलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ९० चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या शानदार शतकामुळे भारताने चार गडी राखून विजय तर मिळवलाच शिवाय २-० ने मालिकेत विजयी आघाडीही घेतली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या रोहितच्या वादळी शतकी खेळीने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. यामध्ये भारताचा महान क्रिकेटपटू, क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाचाही समावेश आहे.
सचिनचा कोणता विक्रम मोडला?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत रोहितने आता दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर सलामीवीर म्हणून १५,३३५ धावा आहेत, तर रोहितने आता १५,४०४ धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग प्रथम क्रमांकावर असून, त्याच्या नावावर सलामीवीर म्हणून १५,७५८ धावा आहेत.
सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय
वीरेंद्र सेहवाग – १५,७५८ धावा (३२१ सामने)
रोहित शर्मा – १५,४०४ धावा (३४३ सामने)
सचिन तेंडुलकर – १५,३३५ धावा (३४६ सामने)
सुनील गावस्कर – १२,२५८ धावा (२०२ सामने)
शिखर धवन – १०,८६७ धावा (२६८ सामने)
वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारे टॉप १० खेळाडू
सचिन तेंडुलकर - १८,४२६ (४६३ सामने)
कुमार संगकारा - १४,२३४ (४०४ सामने)
विराट कोहली - १३,९११ (२९६ सामने)
रिकी पाँटिंग - १३,७०४ (३७५ सामने)
सनथ जयसुर्या - १३, ४३० (४४५ सामने)
महेला जयवर्धने - १२,६५० (४४८ सामने)
इंजमाम उल-हक - ११,७३९ (३७८ सामने)
जॅक कॅलिस - ११, ५७९ ( ३२८ सामने)
सौरव गांगुली - ११, ३६३ ( ३११ सामने)
रोहित शर्मा - १०,९८७ (२६७ सामने)
भारताची मालिकेत विजयी आघाडी
कटकमध्ये भारतीय सघाने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच रोहित आणि त्याच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०४ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रूटने ६९ आणि बेन डकेटने ६५ धावांची प्रभावी खेळी केली. भारतीय संघाने ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अवघ्या ४४.३ षटकांतच केवळ ६ गडी गमावून केला आणि सामन्यासह मालिकाही खिशात टाकली.