विराटच्या गुडघ्याला दुखापत; तीन वर्षांनी सामन्यास मुकला

विराट कोहली गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही.
विराटच्या गुडघ्याला दुखापत; तीन वर्षांनी सामन्यास मुकला
एक्स @ai_daytrading
Published on

नागपूर : विराट कोहली गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. बुधवारी सायंकाळी सरावादरम्यान गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे विराटने विश्रांती घेतल्याचे कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळीस सांगितले. त्यामुळे ३ ‌वर्षांनी प्रथमच विराटवर दुखापतीमुळे एखाद्या लढतीला मुकण्याची वेळ ओढवली.

३६ वर्षीय विराट गेल्या काही काळापासून धावांसाठी संघर्ष करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने पाच कसोटी सामन्यांत एकच शतक झळकावत १९० धावा केल्या. विशेषत: ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूंवर तो सातत्याने फसत होता. त्यानंतर १२ वर्षांनी रणजी स्पर्धेत पुनरागमन करताना त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र दिल्लीकडून खेळणाऱ्या विराटला रेल्वेविरुद्ध फक्त ६ धावा करता आल्या. श्रीलंकेविरुद्ध ऑगस्टमध्ये विराट शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. एकीकडे कसोटी व टी-२०मध्ये सरासरी ५०च्या खाली उतरली असताना किमान एकदिवसीय प्रकारात विराट फॉर्म कायम राखेल, अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याने या एकदिवसीय प्रकारातील पुनरागमन लाभले. यापूर्वी, २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीला पाठदुखीमुळे विराटला मुकावे लागले होते. अन्यथा बहुतांश वेळा त्याने स्वत:हून विश्रांती घेतली आहे. दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागण्याची वेळ त्याच्यावर क्वचितच ओढवली.

दरम्यान, विराटची दुखापत फारशी गंभीर नसून तो सामन्यापूर्वी पायाभोवती पट्टा बांधून सराव करताना दिसला. विराटला एकदिवसीय कारकीर्दीतील १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ९४ धावांची आ‌वश्यकता आहे. त्यामुळे रविवारी तो संघात परतेल, अशी आशा आहे.

हर्षित, यशस्वी यांचे पदार्पण

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी यशस्वी जैस्वाल व हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी दिली. मुंबईचा डावखुरा फलंदाज यशस्वी हा टी-२० व कसोटी प्रकारात छाप पाडल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत त्याला संधी देण्यात आली. त्याशिवाय वेगवान गोलंदाज हर्षितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. मग नुकताच इंग्लंडविरुद्ध कन्कशन (बदली) खेळाडू म्हणून येत त्याने टी-२०मध्ये पदार्पण केले. आता एकदिवसीय पदार्पणातही त्याने ३ बळी मिळवून लक्ष वेधले. यशस्वीला मात्र १५ धावाच करता आल्या.

logo
marathi.freepressjournal.in