‘आकाश’भरारी आणि मालिकेत बरोबरी! दुसऱ्या कसोटीत भारताकडून इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा; गिल सामनावीर
बर्मिंगहॅम : आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर भारतीय संघाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर रविवारी विजयी पताका फडकावली. आकाश दीपने (९९ धावांत ६ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याला क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी फडशा पाडला. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे भारताने प्रथमच एजबॅस्टन येथे कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला.
युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा दुसरा डाव पाचव्या दिवशी ६८.१ षटकांत २७१ धावांत संपुष्टात आला. आकाशनेच ब्रेडन कार्सला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने कार्सचा झेल टिपला. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ झेल घेत आकाशला उत्तम साथ दिली. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी पत्करलेली निवृत्ती आणि तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत खेळतानाही भारताने एजबॅस्टन येथील विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला. एजबॅस्टनवरील यापूर्वीच्या ८ कसोटींपैकी भारताने ७ सामने गमावले होते, तर १ लढत अनिर्णित राहिली होती. यंदा मात्र गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या जोडीने अविश्वसनीय विजय मिळवून टीकाकारांचे तोंड बंद केले.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित व विराट या फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात गेल्या आठवड्यात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मुख्य म्हणजे भारताकडून या कसोटीत पाच शतके झळकावली गेली. परंतु अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण व सुमार गोलंदाजीचा भारताला फटका बसला. बुमरावर अतिविसंबून राहणेही भारताला महागात पडले. इंग्लंडने ३७१ धावांचा पाचव्या दिवशी यशस्वी पाठलाग करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मुख्य म्हणजे गेल्या ९ कसोटींपैकी भारताने फक्त एका सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी एजबॅस्टन येथे विजय मिळवणे अनिवार्य होते. बुमराला विश्रांती देण्यात आल्याने भारताच्या संघनिवडीवरही अनेकांनी टीका केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांत इंग्लंडला ऑलआऊट करून विजय मिळवून दाखवला.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ५८७ धावांचा डोंगर उभारला. गिलने कारकीर्दीतील पहिले द्विशतक साकारले. त्यानंतर हॅरी ब्रूक व जेमी स्मिथच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ४०७ धावा केल्या. सिराजने पहिल्या डावात ६, तर आकाशने ४ बळी मिळवले. भारताला पहिल्या डावात १८० धावांची आघाडी मिळाली. मग दुसऱ्या डावात गिलने पुन्हा दीडशतक साकारल्याने भारताने ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे मोठे लक्ष्य उभे ठाकले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शनिवारी चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ७२ धावा केल्या होत्या. आकाशने जो रूट (६) व बेन डकेट (२५) यांचे अडसर दूर केले होते.
तेथून पुढे रविवारी पाचव्या दिवसाला प्रारंभ करताना आकाशनेच इंग्लंडला पहिल्या पाच षटकांत दोन धक्के दिले. प्रथम त्याने ओली पोपचा २४ धावांवर त्रिफळा उडवला. तर दोन षटकांच्या अंतरात ब्रूकला (२३) पायचीत पकडून आकाशने इंग्लंडची ५ बाद ८३ अशी अवस्था केली. त्यानंतर मग स्मिथ व कर्णधार स्टोक्स यांची जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. मात्र उपहारापूर्वी अखेरचे षटक सुरू असताना सुंदरने स्टोक्सला (३३) पायचीत पकडले आणि इंग्लंडला सहावा झटका दिला.
मग दुसऱ्या सत्रात स्मिथ व ख्रिस वोक्स यांनी आक्रमण केले. इंग्लंडचा संघ धावसंख्येचा पाठलाग करू शकणार नाही, हे स्पष्ट झाले होते. मात्र ते बचाव करण्यावर सातत्याने भर देत होते. स्मिथ व वोक्सने सातव्या विकेटसाठी ४६ धावांची भर घातल्यानंतर कृष्णाने वोक्सला बाद केले. मग आकाशच्या षटकात सलग दोन षटकार लगावल्यावर तिसऱ्या चेंडूवरही षटकार लगावताना स्मिथ फसला व इंग्लंडच्या आशाही मावळल्या. स्मिथने ९९ चेंडूंत ८८ धावा केल्या. टंगचा मग जडेजाच्या गोलंदाजीवर सिराजने अप्रतिम झेल टिपला. अखेरीस ६९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कार्सचा उंच उडालेला झेल कर्णधार गिलने टिपला व सर्व भारतीय खेळाडूंसह स्टेडियममधील उपस्थित तमाम चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कार्सने ३८ धावांची झुंज दिली, मात्र आकाशने पाचवा दिवस गाजवून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सामन्यात द्विशतक व दीडशतक झळकावणाऱ्या गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता १० जुलैपासून लॉर्ड्स येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येईल.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ५८७
इंग्लंड (पहिला डाव) : ४०७
भारत (दुसरा डाव) : ६ बाद ४२७
इंग्लंड (दुसरा डाव) : ६८.१ षटकांत सर्व बाद २७१ (जेमी स्मिथ ८८, ब्रेडन कार्स ३८; आकाश दीप ६/९९)
१
आकाशने कसोटी कारकीर्दीत प्रथमच एका डावात ५ बळी मिळवले. तसेच त्याने या कसोटीत एकंदर १० बळी पटकावले. कसोटीत त्याने एका सामन्यात १० बळी मिळवण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे.
३३६
भारताने परदेशात प्रथमच ३३६ धावांच्या फरकाने विजय नोंदवला. यापूर्वी भारताने २०१९मध्ये वेस्ट इंडिजला ३१८ धावांनी नमवले होते. मात्र तो विक्रम भारताने यावेळी मोडीत काढला.
२१
आकाशने ८ कसोटींमध्ये २५ बळी मिळवले आहेत. यांतील १६ बळी हे त्रिफळाचीत आहेत.
२
भारताने एजबॅस्टन येथे ९ कसोटींमध्ये पहिला विजय नोंदवला. यापूर्वीच्या ८ लढतींपैकी ७ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला, तर १ लढत अनिर्णित राहिली होती. त्यामुळे हा विजय खास आहे.
४३०
भारताच्या गिलने या कसोटीत तब्बल ४३० धावा केल्या. गिलने २६९, तर दुसऱ्या डावात १६१ धावा फटकावल्या. भारतासाठी प्रथमच एखाद्या फलंदाजाने एका कसोटीत इतक्या धावा केल्या.
२
आकाश हा इंग्लंडमध्ये एका कसोटीत १० बळी घेणारा दुसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी चेतन शर्मा यांनी १९८६मध्ये अशी कामगिरी केेलेली.
विराट, गांगुली यांच्याकडून कौतुक
भारताचे माजी कसोटीपटू विराट कोहली, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारताच्या विजयावर स्तुतिसुमने उधळली. तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही कौतुक केले. गिलच्या नेतृत्वात भारताने पहिलीच कसोटी लढत जिंकली. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्वाला प्रारंभ झाला आहे. आता १० जुलैपासून रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटीत बुमरा संघात परतेल, असे अपेक्षित आहे. कृष्णाच्या जागी बुमराला संधी मिळू शकेल. तसेच कुलदीप यादवला संधी मिळणार का, हेदेखील पहावे लागेल. सचिन तेंडुलकरनेही भारताच्या विजयासाठी खास ट्वीट करत कौतुक केले.