विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याचे ध्येय; राजकोट येथे भारताचा आज इंग्लंडशी तिसरा टी-२० सामना

India vs England T20 : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान भारतीय संघ २-० असा आघाडीवर आहे.
विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याचे ध्येय; राजकोट येथे भारताचा आज इंग्लंडशी तिसरा टी-२० सामना
एक्स @BaluStuff
Published on

राजकोट : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान भारतीय संघ २-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे आता राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या लढतीत विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याचे भारताचे ध्येय असेल. या लढतीत प्रामुख्याने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर लक्ष्य असेल. तसेच भारताच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा पुन्हा कस लागणार आहे.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ७ गडी आणि ४३ चेंडू राखून धूळ चारली. सामनावीर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी त्या लढतीत छाप पाडली. त्यानंतर चेन्नईतील दुसऱ्या लढतीत तिलक वर्माने झुंजार नाबाद अर्धशतक झळकावून भारताचा विजय साकारला. अक्षर व वरुण यांच्या फिरकीने त्या सामन्यातही चार बळी मिळवले होते. आता तिसरी लढत जिंकून टी-२०मध्ये आणखी एक मालिका विजय भारताला मिळवता येईल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२०मध्ये अद्याप एकही मालिका गमावलेली नाही.

जुलैमध्ये श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात ३-० अशी धूळ चारल्यानंतर भारताने मायदेशात बांगलादेशवर ३-० असे वर्चस्व गाजवले. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ३-१ अशी मालिका जिंकली. पुढील महिन्यात १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होईल. तसेच टी-२० मालिकेनंतर ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे या मालिकेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीची काळजी घेण्याचेही प्रशिक्षक गौतम गंभीरपुढे आव्हान असेल. यामुळेच मोहम्मद शमीसारखा खेळाडू तंदुरुस्त असूनही त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. नितीश रेड्डी दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला असून मुंबईकर शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आले आहे.

दुसरीकडे, इंग्लंडचा विचार करता कर्णधार जोस बटलर फॉर्मात आहे. मात्र अन्य फलंदाजांकडूनही इंग्लंडला योगदान अपेक्षित आहे. फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथल, हॅरी ब्रूक या सर्वांनीच आतापर्यंत निराशा केली आहे. अर्शदीप सिंगच्या वेगवान माऱ्यासह अक्षर, वरुण व रवी बिश्नोई यांच्या फिरकी त्रिकुटापुढे इंग्लंडची भंबेरी उडत आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी इंग्लंडला मंगळवारी विजय मिळवणे गरजेचे आहे. राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असून येथे दवाचा घटक निर्णायक ठरणार आहे.

तिलक लयीत; सूर्यकुमारवर दडपण

डावखुरा फलंदाज तिलक वर्मा भन्नाट फॉर्मात आहे. तिलक गेल्या ४ टी-२० सामन्यांत बाद झालेला नसून त्याने २ शतक व १ अर्धशतक झळकावताना ३१८ धावा केल्या आहेत. मात्र कर्णधार सूर्यकुमारच्या कामगिरीची भारताला चिंता आहे. गेल्या १७ टी-२० सामन्यांत सूर्यकुमारने २६च्या सरासरीने फक्त ४२९ धावा केल्या आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही सूर्यकुमारला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यामुळे उर्वरित ३ लढतींमध्ये त्याच्यावर लक्ष असेल. संजू सॅमसन, अभिषेक यांच्याकडून संघाला मोठी खेळी अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, शिवम दुबे.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बिथेल, जेमी ओव्हर्टन, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, मार्क वूड, जेमी स्मिथ, साकिब महमूद, ब्रेडन कार्स.

वेळ : सायंकाळी ७ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in