
राजकोट : फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने (२४ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी कामगिरीवर फलंदाजांच्या कामगिरीने पाणी फेरले. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर २६ धावांनी मात करून मालिकेतील आव्हान कायम राखले. मात्र या पराभवानंतरही भारतीय संघ पाच लढतींच्या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे.
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या या लढतीत इंग्लंडने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकांत ९ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. हार्दिक पंड्याने ३५ चेंडूंत ४० धावांची झुंज दिली. अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले. जेमी ओव्हर्टनने इंग्लंडसाठी ३ बळी मिळवले. आता शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी चौथा टी-२० सामना खेळवण्यात येईल.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ७ गडी आणि ४३ चेंडू राखून धूळ चारली. वरुण, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी त्या लढतीत छाप पाडली. त्यानंतर चेन्नईतील दुसऱ्या लढतीत तिलक वर्माने झुंजार नाबाद अर्धशतक झळकावून भारताचा विजय साकारला. अक्षर व वरुण यांच्या फिरकीने त्या सामन्यातही चार बळी मिळवले होते. आता तिसरी लढत जिंकून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आणखी एक टी-२० मालिका जिंकण्याची भारताला संधी होती. टी-२०मध्ये आणखी एक मालिका विजय भारताला मिळवता येईल. जुलैमध्ये श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात ३-० अशी धूळ चारल्यानंतर भारताने मायदेशात बांगलादेशवर ३-० असे वर्चस्व गाजवले. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ३-१ अशी मालिका जिंकली. त्यामुळे सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघ अद्याप अपराजित आहे.
दरम्यान, मंगळवारी तिसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ९ बाद १७१ धावा केल्या. बेन डकेटने ७ चौकार व २ षटकारांसह २८ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारली. तसेच लियाम लिव्हिंगस्टोनने २४ चेंडूंत ४३ धावा फटकावल्या. त्यानंतर मात्र वरुणने अन्य फलंदाजांवर अंकुश ठेवला. वरुणने जोस बटलरसह (२४), जेमी स्मिथ (६), ब्रेडन कार्स (३), जोफ्रा आर्चर (०) यांचे बळी मिळवले. हार्दिकने २ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा (१४ चेंडूंत २४), सूर्यकुमार (७ चेंडूंत १४) यांना मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्माही (१८) चार सामन्यांनंतर प्रथमच बाद झाला. हार्दिकने ४० धावांसह झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉशिंग्टन सुंदर (१५ चेंडूंत ६) व अक्षर (१६ चेंडूंत १५) यांना धावगती वाढवता न आल्याने भारताचा पराभव पक्का झाला. सामनावीर पुरस्कार मात्र वरुणलाच देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ९ बाद १७१ (बेन डकेट ५१, लियाम लिव्हिंगस्टोन ४३; वरुण चक्रवर्ती ५/२४) पराभूत वि. g इंग्लंड : २० षटकांत ९ बाद १४६ (हार्दिक पंड्या ४०, अभिषेक शर्मा २४; जेमी ओव्हर्टन ३/२३)
सामनावीर : वरुण चक्रवर्ती