
पुणे : आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अनुभवी हार्दिक पंड्या (३० चेंडूंत ५३ धावा) आणि मुंबईकर शिवम दुबे (३४ चेंडूंत ५३ धावा) या अष्टपैलूंनी घणाघाती अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १५ धावांनी मात करून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.
भारताने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९.४ षटकांत १६६ धावांत गारद झाला. हर्षित राणाने कन्कशन (बदली) खेळाडू म्हणून येत ३ बळी मिळवले. आता रविवारी वानखेडेवर पाचवी लढत खेळवण्यात येईल.
पुणे, गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र साकिब महमूदने दुसऱ्या षटकात संजू सॅमसन (१), तिलक वर्मा (०) व कर्णधार सूर्यकुमार यादव (०) यांना बाद करून भारताची ३ बाद १२ अशी अवस्था केली. विशेषत: सॅमसन व सूर्यकुमार यांची अपयशाची मालिका कायम असून त्यांना चार लढतींमध्ये एकही अर्धशतक करता आलेले नाही.
३ बाद १२ अशा स्थितीतून अभिषेक शर्मा (२९) व रिंकू सिंग (३०) यांनी डोलारा सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भर घातली. मात्र आदिल रशिदने अभिषेकचा, तर ब्रेडन कार्सने रिंकूचा अडसर दूर केला. ११ षटकांत ५ बाद ७९ वरून मग हार्दिक व शिवमची जोडी जमली. या दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना सहाव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. हार्दिकने टी-२०तील पाचवे अर्धशतक साकारले. तसेच शिवमने चौथे अर्धशतक झळकावले.