
अहमदाबाद : कर्णधार रोहित शर्माला सूर गवसल्यानंतर आता तारांकित फलंदाज विराट कोहलीनेसुद्धा लय मिळवावी, अशी आशा तमाम चाहते बाळगून आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातही विजय नोंदवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचे भारताचे ध्येय असेल.
रोहितच्या नेतृत्वात भारताने पहिल्या तसेच दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला ४ गडी राखून नमवले. पहिल्या लढतीत २५० धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावून छाप पाडली. मग कटक येथील दुसऱ्या लढतीत रोहितने घणाघाती शतक झळकावून चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्मात परतण्याचे संकेत दिले. गोलंदाजीत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांची फिरकी जोडीही छाप पाडत आहे. त्यामुळे आता भारताला प्रामुख्याने विराटची फलंदाजी आणि वेगवान जोडीची कामगिरी यांचीच चिंता सतावत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांविरुद्धच्या ८ कसोटींमध्ये विराटने फक्त १ शतक झळकावले. ऑफस्टम्पबाहेरील चेंडूंवर सातत्याने फसणाऱ्या विराटला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यातही ५ धावाच करता आल्या. त्यामुळे १९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटला लय गवसणे महत्त्वाचे आहे. नोव्हेंबर २०२३नंतर विराटनेसुद्धा एकदिवसीय प्रकारात एकही शतक झळकावलेले नाही. तसेच त्याला एकदिवसीय कारकीर्दीतील १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ८९ धावांची गरज आहे.
दुसरीकडे, जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने दोन्ही सामन्यांत पराभव पत्करला असला तरी त्यांची सलामीची जोडी दमदार फॉर्मात आहे. गोलंदाजी आणि सायंकाळच्या वेळेस येणारे दव इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरत आहे. मधल्या फळीतही इंग्लंडला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. जो रूट व बटलर यांच्याकडून इंग्लंडला मोठी खेळी अपेक्षित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही अखेरची लढत असल्याने दोन्ही संघ त्यांचे सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरवतील.
वेळ : दुपारी १.३० वा. थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ (१) वाहिनी