आजपासून महिलांची इंग्रजी परीक्षा; भारत-इंग्लंड महिला संघांमध्ये नॉटिंघम येथे पहिला टी-२० सामना

एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडशी कसोटी प्रकारात दोन हात करत असताना आता महिला संघही ‘इंग्लिश टेस्ट’साठी सज्ज होत आहे. भारत-इंग्लंड महिला संघांतील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. नॉटिंघम येथे उभय संघांतील पहिली लढत खेळवण्यात येईल.
आजपासून महिलांची इंग्रजी परीक्षा; भारत-इंग्लंड महिला संघांमध्ये नॉटिंघम येथे पहिला टी-२० सामना
Published on

नॉटिंघम : एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडशी कसोटी प्रकारात दोन हात करत असताना आता महिला संघही ‘इंग्लिश टेस्ट’साठी सज्ज होत आहे. भारत-इंग्लंड महिला संघांतील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. नॉटिंघम येथे उभय संघांतील पहिली लढत खेळवण्यात येईल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात उभय संघांत ५ टी-२० सामन्यांनंतर १६ जुलैपासून ३ एकदिवसीय लढतीही होणार आहेत. भारताने मे महिन्यात तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना नमवले. त्या मालिकेतील बहुतांश खेळाडूंना इंग्लंडविरुद्धही संघात कायम राखले आहे. रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार हे वेगवान गोलंदाज व फिरकीपटू श्रेयांका पाटील हे खेळाडू मात्र दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग नाहीत, तर टी-२० संघात २१ वर्षीय आक्रमक सलावीरी शफाली वर्माचे पुनरागमन झाले आहे.

इंग्लंडला गेल्या आठवड्यात दाखल होण्यापूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भारतीय संघाचे २५ दिवसांचे शिबिर पार पडले. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतातच महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे टी-२० मालिकेनंतर होणारी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका निर्णायक ठरेल.

भारतीय संघाची फलंदाजीत उपकर्णधार स्मृती मानधना, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत यांच्यावर भिस्त असेल. तसेच रिचा घोषही उत्तम लयीत आहे. गोलंदाजीत भारताला मुंबईची सायली सतघरे, अरुंधती रेड्डी या वेगवान जोडीसह फिरकी विभागात राधा यादव, दीप्ती शर्मा यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. स्नेह राणा व अमनजोत कौरचे पर्यायही भारताकडे आहेत.

दुसरीकडे इंग्लंडचा संघ नवा कर्णधार व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात नवी सुरुवात करणार आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या नॅट शीव्हर ब्रंटकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून मुंबईचेच प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या चार्लोट एडवर्ड्सकडे इंग्लंडचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडचे अनेक खेळाडू डब्ल्यूपीएलच्या निमित्ताने भारतात खेळतात. त्यामुळे ते भारतीय खेळाडूंच्या मजबूत व कमकुवत बाजू जाणून असतील. एकंदर या मालिकेकडे सर्वांचे लक्ष असून अमोल मुझुमदार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणारा भारतीय महिला संघ दोन्ही मालिकेत विजयी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, श्री चरिणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.

  • वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३

logo
marathi.freepressjournal.in