विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारतीय पुरुष हॉकी संघाची आज डच टेस्ट

पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्थान पक्के करण्यासाठी भारतीय हॉकी संघाला शनिवारी दुसऱ्या फेरीतील पहिल्याच सामन्यात सहयजमान आणि ऑलिम्पिक विजेत्या नेदरलँड्सचा सामना करावा लागणार आहे.
विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारतीय पुरुष हॉकी संघाची आज डच टेस्ट
विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारतीय पुरुष हॉकी संघाची आज डच टेस्ट(Photo-X)
Published on

ॲम्स्टेलवीन : पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्थान पक्के करण्यासाठी भारतीय हॉकी संघाला शनिवारी दुसऱ्या फेरीतील पहिल्याच सामन्यात सहयजमान आणि ऑलिम्पिक विजेत्या नेदरलँड्सचा सामना करावा लागणार आहे. या महामुकाबल्यात भारतीय संघासाठी चुकीला अजिबात वाव नसेल.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पुरुष आणि महिलांच्या हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. भारताने ड-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. भारताले वेल्सला ३-१ असे पराभूत केल्यावर इंग्लंडकडून २-४ असा पराभव पत्करला होता. मात्र पाकिस्तानला ५-३ अशी धूळ चारून भारताने आगेकूच केली. सामन्याची दणकेबाज सुरुवात केल्यानंतरही नंतरच्या सत्रांमध्ये खेळावरील नियंत्रण गमावणे ही भारतीय संघाची मुख्य चिंता ठरली आहे. पाकिस्तानविरुद्ध ४-१ अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर भारताने प्रतिस्पर्ध्याला कमबॅकची संधी दिली होती.

इंग्लंड संघाविरुद्ध मध्यंतरापर्यंत २-१ अशी आघाडी असताना तिसऱ्या सत्रात दोन गोल स्वीकारल्यामुळे भारताला २-४ असा पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या बाजूला, डच संघाने साखळी फेरीत न्यूझीलंडचा ५-१, अर्जेंटिनाचा ३-१ आणि जपानचा ४-१ असा धुव्वा उडवत तिन्ही सामने दिमाखात जिंकले आहेत. यजमान संघाच्या आक्रमक खेळाव्यतिरिक्त स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा सामनाही भारताला करावा लागणार आहे.

स्पर्धेच्या नव्या स्वरूपानुसार ड आणि अ-गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ इ-गटामध्ये आले असून, त्यातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिल्या फेरीत अर्जेंटिनाला पराभूत केल्यामुळे नेदरलँड्सकडे तीन गुण जमा आहेत. भारताने पहिल्या फेरीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारल्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. याच मैदानावर १९७३ मध्ये भारताचा पराभव करत नेदरलँड्सने आपले पहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. मात्र, गेल्या जून महिन्यात रोटरडॅम येथे झालेल्या प्रो लीग सामन्यात भारताने नेदरलँड्सचा ३-२ असा पराभव केला होता. सध्याच्या विश्वचषकात कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक ५ गोल नोंदवले आहेत. मुख्य म्हणजे भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांची जर्सी केशरी रंगाची असल्याने कोणता संघ या लढतीसाठी जर्सी बदलणार, हे पहावे लागेल.

गती राखत बचाव भक्कम करण्याचे आव्हान भारतीय कर्णधाराने मान्य केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या चुकीची पुनरावृत्ती न करता २५ मीटरच्या क्षेत्रात चेंडूवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे हरमनप्रीतने स्पष्ट केले. डच कर्णधार थिएरी ब्रिंकमननेही भारताला धोकादायक संघ मानले असून, हरमनप्रीतच्या फॉर्मचा विशेष उल्लेख केला आहे.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, जिओहॉटस्टार ॲप

पुरुषांचे सामने

  • शनिवार, २२ ऑगस्ट

    वि. नेदरलँड्स (सायं. ७.३० वा.)

  • सोमवार, २४ ऑगस्ट

    वि. अर्जेंटिना (सायं. ६.१५ वा.)

महिलांचा सामना

  • रविवार, २३ ऑगस्ट

    वि. ऑस्ट्रेलिया (रात्री १०.३० वा.)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in